– डॉ. यश वेलणकर
मनासारखे झाले नाही की उदास वाटणे, दु:ख होणे नैसर्गिक आहे. पण दु:ख होणे आणि ‘डिप्रेशन’ हा आजार यांमध्ये फरक आहे. शरीरातील रसायनांत बदल झाल्याने रक्तदाब वाढतो, तसेच मेंदूतील रसायने बदलल्याने ‘डिप्रेशन’ होते. याची तीव्र अवस्था असेल तर त्या वेळी कोणतेच मानसोपचार फारसे उपयुक्त ठरत नाहीत. अशा वेळी मनोविकारतज्ज्ञांकडून औषधे घेणे गरजेचे असते. ‘मेजर डिप्रेशन’मध्ये उदासीसोबत थकवा आणि निष्क्रियता असते. कोणतीही हालचाल करू नये असे वाटते, पण झोपूनही चैन पडत नाही. सारखे रडू येते, एकटेपणा आणि निराशेचे विचार मनात काहूर माजवत असतात. काहीजणांना भीतीदायक दृश्ये दिसतात. प्रकाश चांगला असला तरी समोरील वस्तू मंद प्रकाश असल्यासारख्या गढूळ दिसतात. मनात येणाऱ्या विचारांचा आवर्त तीव्र असल्याने त्यांच्यापासून अलग होता येत नाही. या साऱ्या त्रासापासून पळून जावे असे वाटते आणि त्यामुळेच आत्महत्या घडतात.
अशा वेळी त्या माणसाला कोणताही उपदेश नको वाटतो. शारीरिक हालचाली केल्यानंतर बरे वाटते, हे माहीत असूनदेखील प्रचंड थकवा वाटत असल्याने तेही शक्य होत नाही. याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर आजार वाढत जातो. ‘थायरॉइड हार्मोन्स’ कमी-जास्त झाल्याने जसा त्रास होतो, तसाच मेंदूतील ‘सेरोटोनिन’ रसायन कमी झाल्याने ‘मेजर डिप्रेशन’ हा आजार होतो. कोणत्याही शारीरिक आजाराची माणसाला लाज वाटत नाही, ते लपवून ठेवले जात नाहीत. खरे म्हणजे, ‘डिप्रेशन’ हा तसाच आजार आहे. पित्त वाढले की उलटय़ा होतात, तसे ‘सेरोटोनिन’ कमी झाले की सारखे रडू येते. पण असे रडू येणे दुर्बलता समजली जाते. ‘उलटय़ा करू नको’ असा उपदेश केला जात नाही, पण ‘सारखे रडत राहू नकोस’ असा उपदेश केला जातो.
समाजात याविषयी जागृती करणे खूप आवश्यक आहे. या आजारावरील नवीन औषधे खूप परिणामकारक आहेत. ती सुरू केली की महिनाभरात फरक दिसू लागतो. जग पुन्हा सुंदर आणि स्वच्छ दिसू लागते. त्यामुळे या आजारात औषधांची भीती न बाळगता ती घ्यायला हवीत. औषधांनी आत्मभान वाढले की त्यानंतर मानसोपचार उपयोगी ठरतात. या आजारात लाजण्यासारखे काहीही नाही. तो नाकारल्याने वा लपवून ठेवल्याने बरा होत नाही, तर योग्य उपचारांनी बरा होतो.
yashwel@gmail.com