– डॉ. यश वेलणकर
‘द्वंद्वात्मक मानसोपचार पद्धती’ ही ध्यानाचा उपयोग मानसोपचारात करणारी पहिली पद्धत आहे. तिच्या पाच पायऱ्या आहेत. दुसऱ्या पायरीवर असताना- व्यक्तीने त्याच्या त्रासाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तिला स्वत:च्या भावना, विचार साक्षीभावाने पाहायला आणि ते शब्दांत मांडायला प्रेरित केले जाते. त्यानंतर तिसरी पायरी म्हणजे- यातील त्रासदायक विचारांचे काय करायचे, हे व्यक्तीने ठरवायचे. चिंतनचिकित्सेनुसार ते बदलता येत असतील तर बदलायचे. पण प्रत्येक वेळी हे विचार बदलणे शक्य असते किंवा आवश्यक असते असेही नाही. दुसरा पर्याय म्हणजे ते विचार, भावना आणि त्यामुळे शरीरात होणारे बदल यांचा स्वीकार करायचा. त्यासाठी त्या वेळी ‘माइण्डफुलनेस मेडिटेशन’चा सराव करायचा. तिसऱ्या पायरीवर थेरपिस्ट हे दोन्ही पर्याय शिकवतात.
यानंतर चौथी पायरी म्हणजे रोजच्या आयुष्यात याचा उपयोग करायचा. त्यासाठी क्लायंटला रोज टिपणे-नोंदी ठेवायला सांगितले जाते. बाह्य़ घटना आणि प्रतिक्रिया म्हणून निर्माण होणाऱ्या मनातील भावना आणि विचार यांची नोंद करायची. त्या वेळी विचार बदलता आले की त्यांचा स्वीकार केला, याचीही नोंद ठेवायची. या पायरीवर थेरपिस्टशी किमान फोनवर संपर्क ठेवायला सांगितले जाते. या पायरीवर मनातील भावना आणि विचार कोणते आहेत यापेक्षा त्यांना कसे पाहिले हे स्पष्ट करण्याला महत्त्व दिले जाते. तथाकथित नकारात्मक विचार बदलूनदेखील पुन:पुन्हा येत असतील; तर त्यांना महत्त्व न देता वर्तमान क्षणात लक्ष आणून परिसरात आणि शरीरमनात त्याक्षणी जे काही जाणवते आहे त्याला कोणतेही लेबल न लावता त्याचा स्वीकार करण्याची आठवण पुन:पुन्हा करून देणे, ही थेरपिस्टची जबाबदारी असते.
त्यासाठी ‘डीस्ट्रेस टॉलरन्स’- म्हणजे त्रासदायक मानसिक तणावापासून पळून जाण्याचा प्रयत्न न करता त्यास सामोरे जाऊन जे काही होते त्याचा स्वीकार करणे ही महत्त्वाची गोष्ट असते. त्याबरोबर मनातील भावनांचे गुलाम न होता, त्यांचा हुकूम मानण्याची सवय बदलून ठरवलेल्या कृती करण्याचे कौशल्य विकसित करणे आवश्यक असते. हे शक्य झाले की भावनांचा त्रास कमी होतो. पाचव्या पायरीवर हा त्रास पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून नियमित सराव कसा करायचा, हे शिकवले जाते. ही थेरपी चिंता, औदासीन्य, भावनिक अस्थिरता असलेला व्यक्तिमत्त्वाचा आजार (बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसॉर्डर) आणि व्यसनमुक्तीसाठी उपयुक्त आहे.
yashwel@gmail.com