– डॉ. यश वेलणकर
आपल्याला सर्वानी ‘चवळीची शेंग’ म्हणावे असे वयात येणाऱ्या एखाद्या मुलीला वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठी व्यायाम करणे, सतत खात न राहणे या चांगल्या सवयी आहेत. मात्र जाड होऊ की काय, या भीतीने आवश्यक तो पोषक आहारदेखील न घेणे आणि त्यामुळे अशक्तपणा येणे ही ‘इटिंग डिसॉर्डर’ अर्थात ‘आहार विकृती’ आहे. १२ ते ३५ वर्षे वयात या विकृती अधिक आढळतात. आहार विकृती तीन प्रकारच्या आहेत. त्यातील दोन विकृतींमध्ये वजन कमी होते आणि एका विकृतीमुळे वजन वाढते. अशा विकृती असताना चिंतारोग, भीतीचा झटका येणे, ओसीडी अशाही समस्या असतात.
चिंताजन्य कृशत्व अर्थात ‘अॅनोरेक्झिआ नव्र्होसा’ आजारात रुग्णाचे वजन आदर्श वजनापेक्षा १५ टक्के कमी असते. त्याचे कारण स्थूल होऊ या भीतीने ती व्यक्ती पुरेसे खातच नाही. त्यामुळे भूकही कमी होते. याचे परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतात. पुरेशी पोषकद्रव्ये न मिळाल्याने त्वचा रुक्ष होते, हाडे ठिसूळ होतात, अॅनेमिया होतो. मासिक पाळी अनियमित होते, सतत थंडी वाजते. अशक्तपणामुळे अभ्यास किंवा काम करण्याचा उत्साह राहत नाही, औदासीन्य येते.
‘बुलिमिया नव्र्होसा’ या दुसऱ्या प्रकारात कृशत्व तुलनेने कमी असते. असा त्रास असलेली व्यक्ती निरोगी व्यक्तीसारखे जेवते, पण ती पुन:पुन्हा उलटय़ा करते. जळजळ कमी करण्यासाठी उलटय़ा करीत आहे, असे ती सांगत असली तरी वारंवार अशा उलटय़ा केल्याने तिच्या घशात जखमा होतात, दात खराब होतात आणि अशक्तपणा वाटतो. बारीक दिसणे म्हणजे सौंदर्य असा गैरसमज सिनेमा आणि जाहिरातींमधील स्त्रिया पाहून होतो. त्यामुळे स्वविषयीची चुकीची प्रतिमा तयार होते. असा त्रास असणाऱ्या माणसांना न्यूनगंड असतो. काही प्रमाणात हा त्रास आनुवंशिकही आहे. मानसिक तणाव हेही एक महत्त्वाचे कारण आहे. हा आजार तीव्र असेल तर रुग्णालयात दाखल करून वजन वाढवण्याचे उपायही करावे लागतात; त्रास सौम्य असेल तर मानसोपचार पुरेसे असतात.
म्हैसूर येथील महाविद्यालयात जाणाऱ्या १,६०० विद्यार्थ्यांचे २०१८ साली सर्वेक्षण केले असता, दहा टक्के मुलींत आणि तीन टक्के मुलांत थोडय़ाफार प्रमाणात आहार विकृती असल्याचे आढळले आहे. तरुण कृश व्यक्तींना शक्तिवर्धक औषधे पुरेशी नाहीत, त्यांच्या मनाशीही संवाद महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
yashwel@gmail.com