श्रुती पानसे

एक प्रयोग करावा. त्या प्रयोगात मुलांऐवजी पालकांनी शाळेत जावं. आठ तास त्या बाकांवर बसावं. एकामागोमाग एक वेगवेगळ्या विषयांची माहिती ऐकावी. फक्त मधल्या सुट्टीत पाय मोकळे करावेत. अध्येमध्ये जर उठावं लागलं तर शिक्षकांची समोर जाऊन परवानगी घ्यावी. ते जर नाही म्हणाले, तर पुन्हा जागेवर जाऊन बसावं. सुट्टी होण्याची वाट बघत. विषय आवडता असो किंवा नावडता, सगळ्या विषयांची ते देतील, ती माहिती घ्यायचीच आहे ही सक्ती अर्थातच असणार आहे.

मुलांच्या पातळीवर गेलो तर मुलांना येणारा कंटाळा जाणवेल. रुटीनमध्ये ९५ टक्के वेळा कोणताही बदल होत नाही. काही प्रयोगशील शिक्षक वर्गात वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांच्या वर्गात मुलं नक्कीच तरतरीत राहतात. पण बहुसंख्य वर्ग पारंपरिक खडू-फळा किंवा आता नवीन अवतरलेलं ई-लìनग प्रकाराने चालतात. एक लक्षात घ्यायला पाहिजे की, शिकवण्याच्या या पद्धती मुख्यत: प्रौढकेंद्रित आहेत. बालकेंद्रित नाहीत. जो (माहिती) देणारा आहे, त्याच्या बाजूच्या आहेत. जो घेणारा आहे, त्याच्या बाजूच्या नाहीत. मुलांना बाकावर बसून शिक्षक वर्गात शिकवत आहेत हेच चित्र आपल्याला सगळीकडे दिसतं. एका मागोमाग एक विषयांची माहिती देणं चालू असतं. माहिती दिली जाते, पण किती जणांच्या माहिती लक्षात आली हे समजण्याची यंत्रणा आपल्याकडे नाही.

वर्गात शिकवलेलं लक्षात ठेवणं, स्वाध्याय सोडवणं, या सर्व गोष्टी  हिपोकँपस या अवयवामार्फत लक्षात ठेवल्या जातात. पण त्या नीरस पद्धतीने शिकवल्या तर आत्मसात करण्यात आणि त्यामुळे लक्षात ठेवण्यात अडचणी येऊ शकतात. याऐवजी भावना केंद्रातून म्हणजे अमिग्डालाचा उपयोग करून जर शिकवलं तर मुलं आत्मसात करू शकतील. यानंतर शिकवलेलं लक्षात ठेवण्यासाठी हिपोकॅम्पसचा उपयोग होईल, असं शिक्षकांनी बघावं.

यासाठी माध्यमिकच्या पुढच्या वर्गामध्ये धडय़ावर चर्चा घडवून आणणं हा एक उपाय आहे. धडा वाचल्यावर मुलं एकमेकांशी चर्चा करून प्रश्नांची उत्तरं शोधतील (अ‍ॅक्टिव्ह लìनग). विषयाची तयारी करण्यात भावना गुंतल्यामुळे विषय चांगल्या पद्धतीने आत्मसात होईल. यातून मुलांना सराव करावा लागेल, पण पाठांतराची गरज भासणार नाही. पाठांतरासाठी लागणाऱ्या गोळ्या- औषधांचीही नाही. आत्मविश्वास वाढेल. विषयांची एकामागोमाग केवळ श्रवणभक्ती करण्यापेक्षा दिवसातून दोन वेगवेगळ्या विषयांचे तास असे गेले तर मुलांच्या ग्रहणशक्तीत भर पडेल.

contact@shrutipanse.com

Story img Loader