– डॉ. यश वेलणकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साक्षीध्यानाच्या दुष्परिणामी ‘डिपर्सनलायझेशन’ अर्थात अ-व्यक्तीकरण होऊ शकते, असा काहींचा आक्षेप असतो. ‘शरीरापेक्षा मी वेगळा आहे’ असे ‘डिपर्सनालायझेशन’ या मानसिक आजारात वाटते. माणसावर काही मानसिक आघात झालेले असतील, तर ‘डिसोसिएटिव्ह डिसॉर्डर’ अर्थात विघटन विकृती नावाचा त्रास होऊ शकतो. ‘डिपर्सनलायझेशन’ आणि ‘डिरिअलायझेशन’ हे त्याचेच प्रकार आहेत. बाह्य़ विश्व हे स्वप्नवत आहे असे वाटणे, याला ‘डिरिअलायझेशन’ म्हणतात. जागृतावस्थेत समोर दिसणारे दृश्य सत्य नसून स्वप्न आहे असे वाटू लागले, तर त्याचीच भीती वाटू लागते. आपले आपल्या शरीरावर नियंत्रण राहिलेले नाही, बोलणे-वागणे आपोआप होते, स्वत:च्या इच्छेने होत नाही असे वाटणे, हे ‘डिपर्सनलायझेशन’ या मानसिक विकृतीचे लक्षण आहे. त्या वेळी शरीराचा, हाता-पायांचा आकार बदलला आहे असेही वाटते.

साक्षीध्यानात हे अपेक्षित नसते. साक्षीभाव ही निरोगी मानवी मेंदूची क्षमता आहे. शरीरात जे जाणवते त्याला ‘हे नको’ अशी प्रतिक्रिया लगेच न करणे, याला साक्षीभाव म्हणतात. साक्षीध्यानाचा सराव करताना शरीरात काय जाणवते हे उत्सुकतेने पाहणे, हा निवडलेला प्रतिसाद असतो. ‘डिपर्सनलायझेशन’मध्ये अशी उत्सुकता नसते, भीती असते. मेंदूच्या परीक्षणातदेखील हा फरक दिसून येतो. साक्षीध्यान करीत असताना मेंदूतील ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’चा भावनिक मेंदूशी संपर्क अधिक चांगला असतो आणि भावनिक मेंदूची सक्रियता कमी असते. याउलट ‘डिपर्सनलायझेशन’मध्ये ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’चा मेंदूतील अन्य भागांशी संपर्क तुटलेला असतो, मेंदूतील काही भाग विघटीत झालेला दिसतो. त्याचप्रमाणे भावनिक मेंदू अधिक सक्रिय असतो. त्यामुळे माणसाला तीव्र भीती, चिंता वाटत असते. त्रासदायक प्रसंगांचे स्मरण न राहणे, स्वत:ची ओळख वेगळीच वाटणे, एका व्यक्तीत अनेक व्यक्तिमत्त्वे प्रकट होणे, हे विघटन विकृतीचे अन्य प्रकार आहेत. मानसिक आघातामुळे

मेंदूची एकात्मता कमी झाल्याने असे होते.

असा त्रास होत असेल तर त्यामुळे असणारी तीव्र चिंता, उदासी औषधांनी कमी होत असली तरी विघटनाची लक्षणे कमी करण्यासाठी मानसोपचार आवश्यक असतात. जग स्वप्नवत आहे किंवा शरीरावर माझे नियंत्रण नाही, हादेखील एक विचार आहे; आणि सारे विचार सत्य नसतात हे भान ठेवले, की हा त्रास कमी होऊ शकतो. म्हणजेच विघटन विकृती साक्षीध्यानाचा दुष्परिणाम नाही, साक्षीध्यान हा त्यावरील उपाय आहे.

yashwel@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on disintegration deformities abn