– डॉ. यश वेलणकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेंदूच्या व्यवस्थापकीय कार्यामुळे ‘मी’ अशी एकात्म भावना निर्माण होते. एखाद्या भावनिक आघातामुळे असे होणे थांबते. त्यामुळे काही काळ ‘मी’ कुणी तरी वेगळीच व्यक्ती किंवा शक्ती आहे असे वाटते. याला ‘डिसोसिएटिव्ह डिसॉर्डर’ अर्थात ‘विघटन विकृती’ म्हणतात. आघाताच्या स्मृती विसरल्या जाणे हेही याचेच लक्षण आहे. मराठीमध्ये ‘ध्यानीमनी’ हे नाटक असा आजार झालेल्या स्त्रीचे चित्रण करणारे होते. ती तिच्या मुलांचे मृत्यू विसरून मुले जिवंत आहेत अशाच प्रकारे वागत असते. काही वेळा एकाच व्यक्तीत दोन व्यक्तिमत्त्वे असतात आणि त्या व्यक्तीला एका वेळी एकाच व्यक्तिमत्त्वाचे भान असते. ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’ या हिंदी सिनेमात याचे चित्रण आहे. प्रत्यक्ष आयुष्यातही असे रुग्ण पाहायला मिळतात. एखादी व्यक्ती काही काळ घरातून अचानक निघून जाते. ती रेल्वेने किंवा मोटारसायकलने व्यवस्थित प्रवास करते. त्या वेळचे सर्व भान तिला असते, पण आपण कुठून आलो आहोत हे भान तिला नसते. त्या वेळी तिच्या मनात व्यक्त होणारा ‘मी’ वेगळाच असतो. त्या ‘मी’नुसार ती व्यवहार करीत असते, प्रवास करताना आवश्यक काळजी घेत असते. नंतर अचानक तिला पहिल्या ‘मी’चे भान येते, तो ‘मी’ मनात प्रकट होतो आणि त्या वेळी हा दुसरा ‘मी’ विस्मृतीमध्ये जातो. त्यामुळे आपण येथे कसे आलो, हेच त्या व्यक्तीला समजत नाही. मधला काळ आपण कुठे होतो, हे ती सांगू शकत नाही.

असे त्रास असतील तर औषधांच्या जोडीने ‘माइंडफुलनेस’चा उपयोग होऊ शकतो. काही वेळ अंगात संचार होणे किंवा ज्याला भूतबाधा मानले जाते तेही याच आजाराचे लक्षण आहे. भारतात रांची येथील मनोरुग्णालयात असा त्रास असलेल्या ग्रामीण भागातील सात मुलींना सहा आठवडय़ांचे ‘माइंडफुलनेस’ प्रशिक्षण देऊन त्याचे परिणाम अभ्यासले गेले. ‘इंडियन जर्नल ऑफ सायकीअ‍ॅट्री’मध्ये २०१७ साली त्याविषयीचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. वर्तमान क्षणात लक्ष आणून शरीर आणि मनात जे काही जाणवते त्याची नोंद करून स्वीकार करण्याचे तंत्र या मुलींना शिकवले गेले. अधिकाधिक कृती सजगतेने करण्यास त्यांना प्रोत्साहित केले गेले. वय वर्षे १३ ते १६ दरम्यान असलेल्या या मुलींना हे प्रशिक्षण सुरू केल्यानंतर तीन आठवडय़ांतच चांगले परिणाम दिसू लागले. त्यांची सजगता वाढली.

yashwel@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on dissociative disorder abn