– डॉ. यश वेलणकर
औदासीन्य ही भावना आहे तसाच तो आजारही आहे. भावना आणि आजार यांत फरक करण्याचे तीन निकष आहेत. एक- उदास वाटणे स्वाभाविक आहे; मात्र काही वेळाने ही भावना बदलून उत्साह, एखाद्या कामात रस वाटणे अपेक्षित असते. असे होत नसेल, सतत औदासीन्य राहत असेल तर त्या वेळी ती भावना आजारात बदललेली असते. कोणतीही भावना म्हणजे लैंगिक आकर्षण, राग किंवा चिंतादेखील खूप अधिक काळ कायम राहत असेल किंवा वारंवार मनाचा ताबा घेत असेल, तर मानसोपचार आवश्यक असतात. दुसरा निकष- ती भावना सर्वव्यापी होणे हा आहे. एखाद्या माणसाचा राग येणे स्वाभाविक आहे. पण तो राग सर्वव्यापी झाला, सर्व जगाचा राग येऊ लागला किंवा कशातच रस वाटेनासा झाला, की भावना विकृतीच्या पातळीवर जाऊ लागली आहे हे ओळखावे. हे राग, चिंता, उदासपणा या विघातक भावनांप्रमाणे आनंद या सुखद भावनेविषयीही खरे आहे. एखाद्या दु:खद प्रसंगीदेखील मनात आनंद ही भावना निर्माण होत असेल, तर ते ‘बायपोलर डिसीज’मधील उत्तेजित अवस्थेचे लक्षण असू शकते. भावनिक मेंदूतील सुखद केंद्राच्या अकारण सक्रियतेमुळे मन सतत आनंदी राहणे हीदेखील विकृती असू शकते. येथे साक्षीभावाचा आनंद अपेक्षित नाही. साक्षीभाव मनातील सर्व भावनांना तटस्थपणे जाणणे आहे. तो सतत राहिला तर विकृती नाही! विकृतीचा तिसरा निकष- ती भावना आपले ध्येय गाठण्यात अडथळा निर्माण करते का, हा आहे. ‘फोबिया’ म्हणजे ठरावीक भीती या निकषामुळे उपचारास पात्र ठरते. ही भीती सतत वा सर्वव्यापी नसते. पण त्यामुळे विकासात अडथळा निर्माण होत असेल तर ती दूर करायला हवी. चार माणसांसमोर उभे राहून भाषण करण्याची भीती असेल तर ती ठरावीक प्रसंगातच असते. पण त्या भीतीमुळे नोकरी-व्यवसायात प्रगती होत नसेल तर ती भीती दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शारीरिक संबंधांविषयी भीती असेल तर तिच्यावर लग्न होण्यापूर्वी मात करायला हवी. कल्पनादर्शन ध्यानाला शिथिलीकरण तंत्र आणि साक्षीध्यानाची जोड देऊन कोणतीही भीती घालवता येते. भीती, राग, उदासपणा वा आनंद यांची तीव्रता खूप जास्त असल्यास नातेसंबंध बिघडतात, शरीरावरही दुष्परिणाम होतात. ही तीव्रता साक्षीध्यानाने कमी होऊ शकते.
yashwel@gmail.com