– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वीप्रमाणे ‘हिस्टेरिया’ असे मानसिक आजाराचे निदान आता केले जात नसले, तरी त्याच नावाशी साम्य असणारी एक व्यक्तिमत्त्व विकृती आहे. तिला ‘हिस्ट्रिऑनिक पर्सनॅलिटी डिसॉर्डर’ म्हणतात. ही विकृती असलेल्या व्यक्ती सामाजिक किंवा व्यावसायिक उच्चपदस्थ असू शकतात. त्यांचे संवाद कौशल्य, अन्य माणसांचा उपयोग स्वत:च्या फायद्यासाठी करून घेण्याचे कौशल्य चांगले असते. मात्र सतत स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी भडक मेकअप किंवा कपडय़ांची विचित्र ठेवण ठेवणे, नाटकीपणे बोलणे आणि वागणे ही या व्यक्तींची विशेष लक्षणे असतात. सहकाऱ्यांचा कंटाळा आल्याने नोकरी-व्यवसाय बदलणे, लोकांनी लक्ष दिले नाही किंवा नावे ठेवली की खूप उदास होणे, सतत कौतुकाची अपेक्षा ठेवणे, अशी यांची स्वभाववैशिष्टय़े असतात. स्वत:च्या शारीरिक त्रासाचे अधिक प्रदर्शन करणे आणि त्यासाठी जवळच्या माणसांकडून सेवा करवून घेणे हेदेखील यांचे वैशिष्टय़पूर्ण लक्षण असते. यांच्या भावना वेगाने बदलतात, अपयश सहन करता येत नाही आणि संयम पाळणे खूप कठीण जाते. प्रत्यक्षात फारशी जवळीक नसूनही गळेपडू वृत्तीने ही माणसे स्वत:ची कामे करून घेतात, त्याचमुळे यशस्वीही होतात, नोकरीमध्ये पदोन्नती घेत राहतात; पण मनातून दु:खी आणि अशांत राहतात. अस्वस्थ मनाने धोकादायक निर्णय घेतात आणि अपयश आले की इतरांना दोष देत राहतात. त्यामुळे अधिक दु:खी आणि अस्वस्थ होतात, नाटकी वागत राहतात.

अशांचे औदासीन्य कमी होण्यासाठी औषधे उपयुक्त असली तरी त्यामुळे स्वभाव बदलत नाही. स्वभावाला औषध नसले तरी तो साक्षीभावाच्या सरावाने बदलू शकतो. स्वत:चा त्रास कमी करण्यासाठी भावनांची सजगता वाढवणे आवश्यक असते. मन अस्वस्थ असेल त्या वेळी शरीरावर लक्ष नेण्याचा नियमित सराव केल्याने भावनांची तीव्रता कमी होते आणि सवयीने होणारे वागणे बदलता येते; नाटकी वागणे, बोलणे टाळता येते. इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता वाढली, की माणसांना स्वार्थासाठी वापरून घेणे कमी होते. आंतरिक शांततेचा अनुभव आला, की सतत स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचा आटापिटा कमी होतो. मात्र, त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली साक्षीध्यानाचा नियमित सराव आवश्यक असतो.

yashwel@gmail.com