– डॉ. यश वेलणकर
आधुनिक काळात मुले अधिक स्मार्ट आहेत पण ती आत्मकेंद्री होत आहेत असे जगभरातील शिक्षणतज्ज्ञांना वाटते. त्याचमुळे इतरांशी जुळवून घ्यायला शिकणे हा शिक्षणाचा एक उद्देश असावा हे युनिसेफने मान्य केले आहे. ध्यानामुळे विद्यार्थ्यांना वाचलेले किंवा ऐकलेले पटकन समजते. म्हणजेच ज्ञानसंपादन अधिक सक्षमतेने होते. एक महिना ध्यानाचा सराव केल्याने विद्यार्थी अभ्यासावर लक्ष अधिक चांगले देऊ शकतात, त्यांच्या मनात येणारे इतर विचार त्यांना बेचैन करीत नाहीत. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचा महास्फोट होत असल्याने लक्ष केंद्रित करण्याच्या कौशल्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. त्याचबरोबर विचार जुळत नाहीत म्हणून संबंध तोडणारी माणसे जगभर वाढत आहेत. वैवाहिक आणि व्यावसायिक समस्या त्यामुळे वाढतात आणि अनेक माणसे औदासीन्याची शिकार होतात. काही मतभेद असले तरी दुसऱ्या व्यक्तीच्या भावना समजून घेऊन अनेकांशी समन्वय साधण्याची क्षमता यशस्वी आणि आनंदी आयुष्यासाठी महत्त्वाची असते, ती ध्यानाच्या सरावाने वाढते असे दिसत आहे. एका निरीक्षणानुसार, साक्षीध्यानाचा नियमित सराव करणारे विद्यार्थी राग, चिंता, नैराश्य अशा विघातक भावनांमध्ये अधिक काळ अडकून पडत नाहीत. त्यामुळे भांडण झाले तरी कटुता फार काळ राहात नाही. ध्यानाने केवळ नकारात्मक भावना कमी होतात असे नसून आनंद, कृतज्ञता, समाधान आणि समन्वय अशा सकारात्मक भावना वाढतात असेही संशोधनात दिसत आहे. साक्षीध्यानाच्या दहा आठवडय़ांच्या अभ्यासाने सजगता जेवढी अधिक वाढते तेवढीच समानुभूती (एम्पथी) देखील वाढते का हे पाहण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक वर्ष नियमितपणे ध्यान करणारे काही विद्यार्थी निवडले आणि तेवढय़ाच नवीन विद्यार्थ्यांना हे ध्यान शिकवले. या दोन्ही गटांच्या विद्यार्थ्यांच्या मेंदूचा फंक्शनल एमआरआय ते ध्यानावस्थेत असताना केला. ते ध्यान करीत असताना दोन्ही गटांच्या विद्यार्थ्यांना रडण्याचे आवाज ऐकवले. त्या वेळी नियमित ध्यानाचा सराव करणाऱ्या मुलांच्या मेंदूतील इन्सुला नावाचा भाग अधिक सक्रिय झाला. हा भाग दुसऱ्यांच्या भावना जाणण्यासाठी आवश्यक असतो.
याचाच अर्थ ध्यानाच्या नियमित सरावाने समानुभूतीची क्षमता वाढते. घरात आणि नोकरीत समानुभूती असेल तर जुळवून घेणे शक्य होते आणि वादविवाद कमी होतात. ही क्षमता ध्यानाने वाढत असल्याने परदेशांतील शाळा-कॉलेजात ध्यानाचा उपयोग नियमितपणे होऊ लागला आहे.
yashwel@gmail.com