– डॉ. यश वेलणकर
आपण घेतलेली कोणतीही नवीन माहिती स्मृतीत साठवण्यासाठी मेंदूला थोडा वेळ द्यावा लागतो. तो दिला नाही तर घेतलेल्या माहितीवर प्रक्रिया होत नाही. त्यामुळे ती साठवलीही जात नाही. आपण काहीही ऐकतो, पाहतो, वाचतो; त्याचेच विचार शांत बसलो तर पुन:पुन्हा येतात. असे होणे आवश्यक आहे. ते झाले तरच आपण जो काही अनुभव घेतो, तो स्मृतीत साठवला जातो. त्यामुळे काय लक्षात ठेवायचे आणि काय विसरून जायचे, हे आपण निवडू शकतो. जे लक्षात राहावे असे वाटते, ती माहिती घेतल्यानंतर थोडा वेळ कोणतीही नवीन माहिती घ्यायची नाही. याउलट जे विसरून जावे असे असेल, त्यानंतर लगेच उत्सुकतेने दुसरा अनुभव घ्यायचा. जे लक्षात ठेवायचे असेल, ते पुन:पुन्हा आठवायचे. जे विसरायचे असेल, त्याचे विचार आले तरी त्यांना महत्त्व न देता आपले लक्ष वर्तमान क्षणात- म्हणजे ज्ञानेंद्रिय देत असलेल्या माहितीवर आणायचे. त्याक्षणी ऐकू येणारे आवाज, जाणवणारे स्पर्श उत्सुकतेने अनुभवयाचे.
जागृतावस्थेत माणसाचा मेंदू दोन स्थितींमध्ये असतो. एक तर तो विचारात असतो किंवा वर्तमान क्षणाचा अनुभव घेत असतो. याला ‘रिमेम्बिरग सेल्फ’ आणि ‘एक्स्पेरिअन्सिंग सेल्फ’ म्हणतात. इतर प्राणी नेहमी वर्तमान क्षणाचा अनुभव घेत असतात, एक्स्पेरिअन्सिंग सेल्फ असतात. आधुनिक माणूस मात्र अधिकाधिक वेळ विचारात मग्न असतो.
वार्धक्यातील अल्झायमरचे प्रमाण वाढण्याचे हेही एक कारण आहे, असे शास्त्रज्ञांना वाटते. या व्याधीचे लक्षात न राहणे हे लक्षण असले; तरी मेंदू संशोधकांच्या मते, तो स्मृतीचा विकार नसून नवीन माहिती न साठवण्याचा विकार आहे. या माणसांना त्यांच्या लग्नात जेवायला काय होते, हे आठवू शकते; पण आज जेवलो की नाही, हे आठवत नाही. हा आजार बरा करणारा कोणताही परिणामकारक उपाय नाही. पण त्याची गती मेंदूच्या व्यायामाने आणि ध्यानाने कमी करता येते. जुन्या आठवणींत न रमता वर्तमान क्षणातील अनुभव घ्यायला त्यांना प्रवृत्त करणे, एखादे गाणे ऐकवून ते पुन्हा आठवायला लावणे, असे व्यायाम त्यांना द्यायला हवेत. वार्धक्याने मेंदूत होणारे बदल ध्यानाच्या सरावाने टाळता येतात, हे संशोधनात सिद्ध झाले आहे.
yashwel@gmail.com