– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखाद्या व्यक्तीला झटके येतात, अचानक दिसायचे बंद होते किंवा शरीराच्या हालचाली करता येत नाहीत, अशा वेळी तिच्या सर्व शारीरिक तपासण्या ‘नॉर्मल’ असतील तर ‘हिस्टेरिया’ असे निदान पूर्वी केले जात असे. हा शब्द इतका रूढ झालेला होता की, त्यामधूनच ‘मास हिस्टेरिया’ वगैरे शब्द प्रचलित झाले. मानसोपचारात बदल होत गेले आणि आजाराचे हे नाव आता कालबाह्य झाले आहे. अशी लक्षणे दिसत असतील तर त्यांना आता ‘रूपांतरण विकृती (कन्व्हर्जन डिसॉर्डर्स)’ म्हटले जाते. काही जणांच्या व्यक्तिमत्त्वातच विकृती असेल तर त्यास ‘ढोंगी/नाटकी (हिस्ट्रिऑनिक) व्यक्तिमत्त्व विकृती’ म्हटले जाते. ‘हिस्टेरिया’ हे नाव बदलण्याचे कारण या नावातून सूचित होणारी कारणमीमांसा चुकीची आहे हे सिद्ध झाले आहे. ‘हिस्टेरिया’ हा शब्द ग्रीक काळापासून या आजारासाठी वापरला जाऊ लागला. हा आजार केवळ स्त्रियांनाच होतो आणि त्याचे कारण त्यांच्या गर्भाशयात आहे, असा तेव्हा समज होता. ग्रीक भाषेत गर्भाशयाला ‘हिस्टेरा’ असा शब्द होता आणि त्यावरून हे नाव आलेले होते. कामभावना दडपल्या गेल्याने हा आजार होतो, त्यामुळे लग्न लावून देणे हा यावरचा उपचार असायचा. आपल्या समाजात अजूनही एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास असेल, तर लग्न केले की हा त्रास कमी होईल असा गैरसमज आहे. त्याचे मूळ सर्व मानवी संस्कृतींमधील या समानतेमध्ये असू शकेल. पूर्वी ‘हिस्टेरिया’चे प्रमाण तरुण किंवा चाळीशीच्या अविवाहित किंवा विधवा स्त्रियांत अधिक दिसत असे. सिग्मंड फ्रॉइड यांनी या आजाराचे कारण दडपलेल्या कामवासना हेच दिले असले, तरी हा आजार पुरुषांनादेखील होतो असे त्यांनी प्रथम सांगितले. त्यांनीच बालवयातील भावनिक किंवा लैंगिक आघात हेही याचे एक कारण नमूद केले असून, ते आधुनिक संशोधनात खरे असल्याचे दिसते आहे. त्यामुळे अशी लक्षणे दिसत असतील तर आघातोत्तर तणाव या आजाराची शक्यताही गृहीत धरली जाते. तरुण पुरुषांतही हा आजार मोठय़ा प्रमाणात दिसून येतो. त्याचा गर्भाशयाशी संबंध नसल्याने त्यावरून आलेले नाव अमेरिकी मानसरोग संघटनेने साठच्या दशकातच बदलले. त्याला आता ‘रूपांतरण समस्या’ म्हटले जाते. मात्र, भारतात हा आजार ‘हिस्टेरिया’ या नावानेच सामान्यजनांत आजही ओळखला जातो. आता जाणीवपूर्वक हे नाव कालबाह्य करायला हवे.

yashwel@gmail.com