– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्पना करणे आणि एखादे दृश्य कल्पनेने पाहणे, या एकमेकांशी संबंधित क्रिया आहेत. वास्तवात नसलेले दृश्य स्वप्नात दिसते, तसेच काही वेळा झोप नसतानाही दिसते. आठवणीत कोरली गेलेली काही भूतकाळातील दृश्ये किंवा प्रतिमा डोळे उघडे असतानाही दिसू शकतात. ‘आघातोत्तर तणाव’ असेल तर अशी दृश्ये वारंवार दिसतात. पूर्वी घडून गेलेला प्रसंग पुन्हा घडतो आहे असे काही वेळ वाटते, पण लगेच हे वास्तव नसून भास आहे याचे भान येते. ‘स्किझोफ्रेनिया’मध्ये मात्र ही दृश्ये खरीच आहेत असे वाटते, त्यामुळे ती व्यक्ती या प्रतिमांशी बोलते. काही जणांना प्रतिमा न दिसता आवाज ऐकू येतात. अर्थात असे कल्पनेने दृश्ये दिसणे किंवा ऐकू येणे हे नेहमी आजाराचेच लक्षण असते असे नाही. सॉक्रेटिसला आणि काही प्रेषितांना असे आवाज ऐकू येत असत असे त्यांनी लिहून ठेवले आहे. अनेक लेखक त्यांच्या कथा-कादंबरीतील पात्रांशी बोलतात. ही पात्रे कसे वागायचे हे त्यांचे तीच ठरवतात असे काही लेखकांना वाटते. मनात सतत त्याच कथानकाचा विचार केल्याने असे होते, असे मानसशास्त्रज्ञांना वाटते.

लहान मुलांच्या मनात असे काल्पनिक सवंगडी असतात. मुले त्यांच्याशी बोलतात, खेळतात आणि भांडणदेखील करतात. देव किंवा गुरू हे मोठय़ा माणसांचेदेखील असे सवंगडी असू शकतात. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ अशी दृढ श्रद्धा असेल आणि सतत त्या कल्पनेचे अनुसंधान असेल, तर पंढरपुरात न जाताही विठ्ठलाचे दर्शन होऊ शकते.

वास्तवात समोर नसणारे दृश्य माणसाला दिसते, त्या वेळी त्याच्या मेंदूत काय घडते हे आता समजले आहे. माणूस समोरील दृश्य पाहतो तेव्हा त्याच्या डोळ्यांतील ‘रेटिना’ या भागात सक्रियता असते. तेथून ‘ऑप्टिक नव्‍‌र्ह’मधून हा संदेश मेंदूत जातो आणि मेंदूत दृश्य जाणणारा भाग सक्रिय होतो. काल्पनिक दृश्य दिसते त्या वेळीही मेंदूतील दृश्य जाणणारा भाग सक्रिय असतो; मात्र डोळ्यांत ‘रेटिना’मध्ये सक्रियता नसते. सतत कल्पनादर्शन ध्यान केल्याने आणि त्याला भावनांची जोड असेल तर असे ‘दर्शन’ होऊ शकते. एखाद्या दृश्याची तीव्र भीती कोरली गेली असेल तरीही ते दृश्य दिसू शकते. असे दृश्य हाही ‘विचार’ आहे. त्याचा त्रास होत असेल, तर तो कमी करायचे उपाय मानसोपचारांत शिकवले जातात.

yashwel@gmail.com