– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माणूस जागेपणी जे अनुभव घेतो, ते स्मरणात राहण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे, असे संशोधनात दिसत आहे. विशेषत: झोपेतील स्वप्नांचा स्मरणशक्तीच्या विकासात खूप सहभाग असतो, असे अनेक प्रयोगांतून आढळले. स्वप्ने का पडतात, हे सांगणारे अनेक सिद्धांत आहेत. त्यांतील महत्त्वाच्या सिद्धांतानुसार तात्कालिक स्मरणशक्तीमधील माहिती दीर्घकालीन स्मरणशक्तीमध्ये साठवली जात असताना माणसाला स्वप्ने पडतात. काही जणांना स्वप्ने आठवत नसल्याने ती पडत नाहीत असे वाटले, तरी ती पडत असतात. एखादा माणूस रोज जेवढी झोप घेत असेल तेवढी झोप त्याला दिली, पण त्यामध्ये स्वप्नावस्थेची झोप दिली नाही तर दोन दिवसांत त्याची भ्रमिष्टासारखी अवस्था होते. स्वप्ने प्राण्यांनाही पडतात. स्वप्ने पडू लागली की डोळ्यांची बुबुळे वेगाने हालचाल करू लागतात. त्यामुळे झोपेच्या या अवस्थेला ‘रॅपिड आय-मुव्हमेंट स्लीप’ म्हणतात.

या अवस्थेत मेंदूमध्ये बरीच कामे होत असतात. मात्र शरीराचे सारे स्नायू या वेळी पूर्ण शिथिल असतात. त्यांची हालचाल होऊ नये यासाठीच असे होते. त्यामुळे स्वप्नात आपण वेगाने धावत असलो, तरी प्रत्यक्षात पायांची हालचाल होत नाही. स्नायू पूर्ण शिथिल झाले नाहीत तर ते हलतात किंवा झोपेत बोलले जाते. स्वप्ने पडत असताना हातपाय हलले नाहीत तरी; भीतिदायक स्वप्ने असतील तर हृदयाचे ठोके वाढतात, घाम फुटतो. आघातोत्तर तणाव या आजाराचे हे एक लक्षण आहे. काही वेळा असा आघात आठवत नसला, तरी झोपेत भीतिदायक स्वप्ने पडतात. त्याचे कारण मानसिक तणाव हेच असते. असा तणाव जागृत मनाला जाणवत नसला, तरी अव्यक्त स्मरणशक्तीमध्ये तो असतो. झोपेत भीतिदायक स्वप्ने पडण्याचा उद्देश अव्यक्त स्मरणशक्तीमधील भीती काढून टाकणे हा असतो, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे.

मात्र त्या स्वप्नातील शारीरिक बदलांमुळे झोपमोड होते आणि मेंदूतील हे काम तसेच राहते. त्यामुळे अशी स्वप्ने पुन:पुन्हा पडतात. ती स्वप्ने आठवत असतील तर जागे असताना धाडस दाखवून त्यांचे कल्पनादर्शन ध्यान केले- म्हणजे जे स्वप्न पडते ते जागेपणी डोळे बंद ठेवून पुन्हा पाहिले आणि त्या वेळी दीर्घ श्वसन सुरू ठेवले, भीती कमी झाली की शरीरातील संवेदनांचा स्वीकार केला, तर भावनिक मेंदूत साठवलेली अव्यक्त स्मरणशक्ती बदलली जाते. त्यामुळे भीतिदायक स्वप्ने कमी होतात.

yashwel@gmail.com