– डॉ. यश वेलणकर
संतोष, कृतज्ञता, क्षमा अशा उन्नत भावना मनात काही वेळ धरून ठेवणे याला करुणा ध्यान म्हणतात. ज्या व्यक्तींनी मदत केली आहे त्यांना कृतज्ञता व्यक्त करणे सोपे; पण ज्यांनी त्रास दिला आहे त्यांना मनातल्या मनातदेखील क्षमा करणे कठीण असते. मात्र अशी क्षमा करत नाही तोपर्यंत त्याच व्यक्तीचे आणि तिने दिलेल्या त्रासाचे विचार आपले आंतरिक विश्व व्यापून टाकतात. त्याचा विसर पडायला हवा असेल तर ती व्यक्ती जे वागली ते व्यक्तिमत्त्वात विकृती असल्याने वागली, ती व्यक्ती निरोगी नाही याचे भान ठेवून ‘ती निरोगी होवो’ असा विचार काही वेळ धरून ठेवणे गरजेचे असते. तिला क्षमा करायचे याचा अर्थ ती जे काही वागेल ते गोड मानायचे असे नाही. तिचे जे वागणे त्रासदायक असेल ते स्पष्ट शब्दांत पण शांतपणे तिला सांगायला हवे. ते सांगूनही तिचे वागणे बदलत नसेल तर तिच्याशी संबंध कमी करायला हवेत, ती घरातच राहात असेल तर तिला महत्त्व देणे कमी करायला हवे. ती व्यक्ती कार्यालयीन सहकारी किंवा वरिष्ठ असेल तर कामापुरता संबंध ठेवायला हवा. पण ती व्यक्ती समोर नसतानाही आठवत राहाते, तिचा राग आपल्या कार्यक्षमतेवर, आरोग्यावर परिणाम करू लागतो.
असा राग आला की शरीराकडे लक्ष देऊन रागामुळे निर्माण होणाऱ्या संवेदना साक्षीभाव ठेवून स्वीकारायच्या. असे केल्याने रागाची त्या वेळी तीव्रता कमी होते. पण असा राग पुन:पुन्हा येणे कमी करायचे असेल तर रोज पाच मिनिटे त्या व्यक्तीला कल्पनेने पाहायचे. असे पाहिल्यानेही तळपायाची आग मस्तकाला जाते. त्या संवेदनेचा स्वीकार करायचा, काही वेळ दीर्घ श्वसन करायचे आणि नंतर तिचे भले होवो, खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रति वाढो, मी त्या व्यक्तीला क्षमा करीत आहे हे विचार आणि भाव मनात धरून ठेवायचे. त्या व्यक्तीनेही कुणाला तरी मदत केली असेल, तिचेही काही गुण असतील ते आठवायचे.
असे केल्याने त्या व्यक्तीच्या द्वेषामुळे आपल्याला होणारा त्रास कमी होतो. त्या व्यक्तीची दुष्कृत्ये थांबण्यासाठी जे प्रयत्न शक्य आहेत ते करायला हवेत; पण त्यासाठी सतत तिचे स्मरण गरजेचे नाही. असे स्मरण आपला रक्तदाब वाढवीत असते. तो कमी करण्यासाठी क्षमा ही भावना आवश्यक आहे. स्वहितासाठी तरी ती करायला हवी.
yashwel@gmail.com