– डॉ. यश वेलणकर
मनात येणारे विचार आपल्या भावना निर्माण करतात. मनाला पटलेले तत्त्वज्ञान ठरावीक विचारांना जन्म देते. याचसाठी तत्त्वज्ञान आणि मानसोपचार यांचा निकटचा संबंध आहे. तत्त्वज्ञान फोल आहे, हेदेखील एक तत्त्वज्ञानच आहे! तत्त्वज्ञान म्हणजे मनात ठसलेल्या समजुती आणि विश्वास असतात. माणसाला निर्णयाचे स्वातंत्र्य आहे की नाही, हे सांगणारी अनेक वेगवेगळी मते आहेत. पण त्यातील कोणत्याही एका मताचा टोकाचा आग्रह मनात ठसलेला असेल, तर त्याचा परिणाम विचार, वागणूक आणि व्यक्तिमत्त्वावर होतो. आपण लहानपणापासून जे ऐकतो, पाहतो, वाचतो आणि विचार करतो, त्यानुसार माणसाच्या समजुती पक्क्या होत जातात. माणूस हा कठपुतळीसारखा आहे, तो काहीच बदलवू शकत नाही. हा विचार मनात ठसलेला असेल तर अशी व्यक्ती स्वत:ला ‘व्हिक्टिम’, ‘बळीचा बकरा’ समजू लागते. या समजुतीमुळे माणूस निष्क्रिय होतो, परिस्थिती बदलण्यासाठी आवश्यक परिश्रम तो करीत नाही. तो स्वत:च्या स्वास्थ्याची, आपल्या भविष्याची जबाबदारी घ्यायलाही तयार नसतो.
याउलट, सारे काही आपल्या नियंत्रणात आहे वा असायला हवे ही समजूत चिंता आणि अपराधीपणा वाढवते. एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू होतो किंवा कुणाला तरी अपघात होतो आणि ‘तो माझ्यामुळेच झाला, मी जे करायला हवे होते ते केले नाही’ याची खंत वाटत राहते; पण आता करण्यासारखे काहीच नसते. सध्या जे काही घडते आहे ते बदलण्यासाठी काही तरी करायला हवे, असे विचार येतात. पण काय करायला हवे, ते सुचत नाही. काही वेळा काहीही न करता शांत राहणेदेखील योग्य असते. काळ बदलला की परिस्थिती बदलते. पण असे काहीही न करणे मनाला पटत नाही.
‘मी काहीच बदल घडवू शकत नाही’ आणि ‘सारे काही माझ्या नियंत्रणात असलेच पाहिजे’ या विचारांच्या दोन अतिरेकी चौकटी बदलून- कोणत्या गोष्टी माझ्या नियंत्रणात आहेत व कोणत्या नाहीत, असा विचार करण्याची सवय स्वत:ला लावणे सर्वागीण स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. काही वेळा हे बुद्धीला पटत असले तरी मनाची अस्वस्थता कमी होत नाही. अशा वेळी त्याच त्या विचारांत न राहता शरीरातील संवेदनेकडे ध्यान देऊन त्यांचा स्वीकार केल्याने अस्वस्थता कमी होते.
yashwel@gmail.com