– डॉ. यश वेलणकर
ध्यानाचा सर्वाधिक आश्चर्यकारक परिणाम मेंदूतील गॅमा लहरींवर दिसून येतो. डिजिटल ईईजीचा (इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम) शोध लागेपर्यंत गॅमा लहरी माणसाला माहीत नव्हत्या. जुन्या ईईजी तपासणीत २५ हर्ट्झपेक्षा अधिक वेगवान लहरी नोंदवता येत नसत. आधुनिक यंत्रांमुळे त्यांची नोंद शक्य झाली आहे. २५ ते १०० हर्ट्झच्या या लहरी मेंदूच्या ‘थलॅमस’ या भागात उत्पन्न होतात आणि सर्व मेंदूत पसरतात. या वेळी मेंदूच्या सर्व भागांचा समन्वय साधला जातो, असे मेंदूतज्ज्ञ मानतात. मतिमंद आणि गतिमंद मुलांमध्ये, त्याचप्रमाणे औदासिन्य, स्किझोफ्रेनियासारखे आजार असतील, तर या लहरी कमी असतात. कलाकार, खेळाडू उत्तम कामगिरी करत असतात, तेव्हा त्यांच्या मेंदूत या लहरी असतात. त्या वेळी त्या माणसाची संवेदनशीलता, ग्रहण आणि स्मरणशक्ती वाढलेली असते.. तो ‘बीइंग इन द झोन’ असतो.
मेंदूची माहितीवर प्रक्रिया करण्याची गती वेगाने होत असते, त्याचवेळी या वेगवान लहरी मेंदूत तयार होतात. १९८८ मध्ये फ्रान्सिस क्रीक यांनी प्रथम अशा प्रकारच्या लहरींविषयी सिद्धांत मांडला. निरोगी व्यक्ती एखादे मनोवेधक दृश्य पाहात असताना मेंदूच्या सर्व भागांत अशा वेगाने वाहणाऱ्या लहरी त्यांना आढळल्या. सजगता आणि एकाग्रता यांचा मेळ साधला जातो तेव्हा अशा लहरी निर्माण होतात, असे मत आंद्रेस एंजल यांनी मांडले. गायक, वादक, नर्तक ‘पीक परफॉर्मन्स’ देत असतो, अतिशय आनंददायी अशी मनाची ‘फ्लो’ स्थिती अनुभवत असतो, त्या वेळी मेंदूत अतिशय वेगवान गॅमा लहरी असतात. झोपेत स्वप्ने पडत असतानाही काही वेळा या लहरी दिसतात.
या लहरी प्रयत्नपूर्वक निर्माण करू शकतो, असे शास्त्रज्ञ म्हणू लागले आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक वर्षे ध्यानसाधना करणाऱ्या तिबेटी योग्यांवर संशोधन केले. अनेक वर्षे ध्यान करणाऱ्या या योग्यांच्या मेंदूत जेवढय़ा गॅमा लहरी आढळल्या, तेवढय़ा लहरी कधीच कोणत्याही निरोगी माणसांमध्ये आढळल्या नव्हत्या. नव्याने करुणा ध्यान करू लागलेल्यांच्या मेंदूतील या लहरींचे प्रमाण अधिक सरावानंतर पूर्वीपेक्षा वाढते, असेही मेंदू शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. योगातील भ्रामरी करीत असतानादेखील मेंदूत या लहरी अधिक प्रमाणात तयार होतात. त्यामुळे औदासिन्यामध्ये भ्रामरी प्राणायाम आणि आनंद, कृतज्ञता अशा भावना मनात धरून ठेवण्याचे करुणा ध्यान उपयोगी ठरते.
yashwel@gmail.com