– डॉ. यश वेलणकर
शारीरिक व्याधी बऱ्या करण्यासाठी ध्यानाचा उपयोग डॉ. डीन ओर्निश यांनी नव्वदच्या दशकातच केला होता. ‘रिव्हर्सिग हार्ट डिसीज’ हा त्यांचा प्रयोग आणि त्यावर आधारित त्यांचे पुस्तक तेव्हापासून लोकप्रिय आहे. हृदयाच्या रक्तवाहिनीत अडथळे असलेल्या रुग्णांनी शस्त्रक्रिया न करता स्वत:ची जीवनशैली बदलली, आहारात बदल केले, ते व्यायाम करू लागले आणि तणाव व्यवस्थापन करायला शिकले. आहार, विहार आणि विचारांच्या चुकीच्या सवयी हृदयरोग निर्माण करतात आणि त्या सवयी बदलल्या तर शस्त्रक्रिया न करताही रक्तवाहिन्यांतील अडथळे कमी होतात हे या प्रयोगाने जगासमोर आले. रक्तवाहिन्यांत ब्लॉकेज निर्माण होण्यात मनातील भावना हेही महत्त्वाचे कारण आहे, हे ओळखून डॉ. ओर्निशनी हृदरोगरुग्णाच्या भावनिक स्वास्थ्यासाठी ध्यानाच्या विविध प्रकारांचा उपयोग केला होता.
चिंता, भीती कमी करण्यासाठी साक्षीध्यान महत्त्वाचे होतेच. त्याबरोबर रक्तवाहिन्यांतील अडथळे स्वच्छ होऊन त्यामधून आवश्यक तेवढे रक्त हृदयाला मिळत आहे, असे कल्पनादर्शन ध्यान करायला त्यांनी सहभागी रुग्णांना शिकवले. रक्तवाहिन्यांतील अडथळे हे वास्तव असले तरी त्यांचे मूळ कारण व्यक्तीचा एकाकीपणा आणि त्याने मनाने निर्माण केलेल्या भिंती हे असू शकते, हे लक्षात घेऊन त्यांनी वेगळ्या प्रकारचे ध्यान उपयोगात आणले. त्याला त्यांनी ‘रिसेप्टिव्ह व्हिज्युअलायझेशन’ म्हटले. डोळे बंद करून आपण एखाद्या शांत, रम्य ठिकाणी आहोत आणि आपले हृदय आपल्याला भेटत आहे अशी कल्पना करायची. त्यानंतर जे काही चित्र दिसेल किंवा जसा आवाज ऐकू येईल त्याच्याशी संवाद साधायचा, त्याने आयुष्यभर जी सोबत केली आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आणि तू पूर्णत: निरोगी होण्यासाठी काय करायला हवे असा प्रश्न हृदयालाच विचारायचा. काही जणांना आपले हृदय दिसत नाही, त्याऐवजी एखादी भिंत दिसू शकते. त्या भिंतीशीच संवाद साधायचा; ती भिंत कशापासून हृदयाचे संरक्षण करते आहे हे तिलाच विचारायचे, तिने काही वेळ बाजूला होऊन हृदयाशी भेट घडवावी अशी विनंती करायची.
अशा प्रकारचे ध्यान केल्यानंतर अनेक रुग्णांना दिसणारी चित्रे आणि येणारे अनुभव डीन ओर्निश यांनी त्यांच्या ‘रिव्हर्सिग हार्ट डिसीज’ या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत.
yashwel@gmail.com