डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिप्नोटिझमचा उपयोग थेरपी म्हणून फ्रान्झ मेस्मर या जर्मन डॉक्टरने १७७४ मध्ये सर्वात प्रथम केला आणि १७७९मध्ये त्यावर पुस्तक प्रसिद्ध केले. त्यामुळेच या उपचार पद्धतीला ‘मेस्मेरिझम’ असे म्हटले जाई. त्याच्या मते हिप्नोथेरपिस्ट कोणत्या तरी अद्भुत शक्तीचा उपयोग रुग्णावर करतो आणि रुग्णाला एका विशिष्ट मानसिक स्थितीत नेतो. या शक्तीला त्याने ‘प्राणिक चुंबकीय शक्ती’ म्हटले होते. १८८० मध्ये जेम्स ब्रेड या इंग्लिश डॉक्टरने याचा अधिक अभ्यास करून त्याला हिप्नोसिस हे नाव दिले. या स्थितीला चुंबकीय शक्ती कारणीभूत नसून एकाग्रतेने ग्रहण केलेल्या सूचनांमुळे हे होते असे त्यांनी मांडले. हिप्नोसिस हे नाव ग्रीकांच्या झोपेच्या देवतेच्या नावावरून घेतले होते. कारण संमोहित स्थिती ही निद्रा सदृश असते.

गाढ झोप लागते त्यावेळी माणसाला परिसराचे भान राहत नाही. संमोहित व्यक्तीला देखील परिसराचे भान नसते, मात्र त्याला दिल्या जाणाऱ्या सूचनांचे ज्ञान होत असते. झोपेत सूचनांचे ज्ञान नसते, त्यामुळे ही झोपेपेक्षा वेगळी स्थिती आहे. हिचा उपयोग करून रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. अशा संमोहित अवस्थेत शस्त्रक्रिया करताना होणाऱ्या वेदनांचे ज्ञान होत नाही. कोणतेही भूल आणणारे औषध न वापरता शस्त्रक्रिया होऊ शकली. मात्र अशी स्थिती येण्यासाठी त्या इच्छुक रुग्णाला सहा महिने प्रशिक्षण घ्यावे लागले होते!

यामध्येच संमोहन चिकित्सेच्या मर्यादा आहेत. संमोहित अवस्थेत जाण्यासाठी त्या व्यक्तीची इच्छा पुरेशी नसते, खूप एकाग्रता आणि सूचनांचे पालन करण्याची तयारी देखील गरजेची असते. त्यामुळेच खूप कमी माणसे संमोहित अवस्थेत जाऊ शकतात. लहान मुले आणि ज्यांना आज्ञा पालन करायची सवय आहे असे सैनिक किंवा पोलीस अधिक प्रमाणात संमोहित होऊ शकतात, असे अभ्यासात आढळले आहे.

संमोहित अवस्थेत काय बोलायचे नाही याचे भान नसते, त्यामुळे दडपलेल्या स्मृती आणि भावना अशा अवस्थेत जाणल्या जाऊ शकतात, असा विचार करून फ्रॉइडने याचा उपयोग सुरू केला होता. मात्र त्यामुळे अनेक रुग्णांत यश येत नाही असा अनुभव आल्याने त्यांनी मनोविश्लेषण ही मानसोपचार पद्धती विकसित केली. त्यामुळेच संमोहनाचा करमणुकीसाठी उपयोग होत असला तरी तिला मानसोपचार म्हणून फार स्थान राहिलेले नाही.

yashwel@gmail.com