– डॉ. यश वेलणकर
माणूस जागेपणी स्वत:च्या इच्छेने कल्पनादर्शन करू शकतो. झोपेत असे कल्पनादर्शन होते त्यालाच आपण स्वप्ने म्हणतो. पण कोणती स्वप्ने पडायला हवीत हे सामान्य माणूस ठरवू शकत नाही. स्वप्ने का पडतात याचे अनेक सिद्धांत मेंदू संशोधक मांडत आहेत. काही स्वप्ने झोपमोड होऊ नये म्हणून पडतात. खरोखर दारावरची घंटा वाजली तर स्वप्नात तसा आवाज ऐकू येतो, दात दुखत असेल तर दात पडला असे स्वप्न पडते. दुसऱ्या सिद्धांतानुसार मेंदूने जे काही अनुभव घेतले आहेत त्यांचे विश्लेषण करून अधिक काळ साठवण्याच्या स्मृती वेगळ्या केल्या जातात त्या वेळी स्वप्ने पडतात. मनात एखादी समस्या असेल तर त्याविषयीच्या नवकल्पना स्वप्नात दिसू शकतात. अनेक शोध अशा स्वप्नांमुळे लागलेले आहेत. मेंदूतील तार्किक विचार करणारा भाग झोपेत शांत असतो त्यामुळे अशा नवीन कल्पना सुचू शकतात. काही स्वप्ने वेगळीच असतात- दैनंदिन आयुष्यात कधीही न अनुभवलेल्या गोष्टी स्वप्नात दिसतात.
काही जणांना भीतिदायक स्वप्ने पडतात. मेंदुतज्ज्ञांच्या मते अशा स्वप्नांतून मेंदू स्वत:लाच प्रशिक्षण देत असतो. मेंदूचे महत्त्वाचे काम परिस्थितीचे आकलन करून स्वहिताच्या दृष्टीने पुढील निर्णय घेणे हे आहे. विविध प्रसंगी परिस्थितीचे आकलन व्हावे यासाठी मेंदू अशा कल्पना तयार करतो आणि त्याच स्वप्नात दिसतात. अशी स्वप्ने आठवत असतील तर जागेपणी ती पुन्हा कल्पनेने पाहायची आणि त्या वेळी शरीरातील संवेदना स्वीकारायच्या. असे केल्याने भीतिदायक स्वप्नांचा त्रास कमी होतो.
स्वप्नांना फार महत्त्व देणे आवश्यक नाही. जागे असतानाही मनात येणाऱ्या सर्व विचारांना महत्त्व द्यायचे नसते. स्वप्ने हे तर झोपेतील विचार आहेत. त्यामुळे त्यांचा विचार करण्यात जागेपणीचा वेळ घालवणे आवश्यक नाही. स्वप्न-विश्लेषण ही फ्रॉइडची पद्धत मेंदुविज्ञानाला मान्य नाही. कारण स्वप्नांचे प्रतीकात्मक अर्थ लावणे हे जागेपणीचे कल्पनारंजन आहे. त्याचे वेगवेगळे अर्थ लावता येतात. जागे झाल्यानंतर आठवणाऱ्या स्वप्नांचा साक्षीभाव ठेवून स्वीकार करणे अधिक योग्य! आयुर्वेदानुसार पित्तप्रकृतीमुळे व रजोगुण वाढला की स्वप्नांचे प्रमाण वाढते. स्वप्नांनुसार शरीरातील त्रिदोष ओळखण्याचे काही सिद्धांत आयुर्वेद ग्रंथांत आहेत; पण त्यावर अधिक संशोधन गरजेचे आहे.
yashwel@gmail.com