– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माणसाच्या ‘जैविक भावना’ जीव वाचवण्यासाठी आवश्यक आहेत. जंगलात असताना समोर वाघ आला की त्यापासून बचाव या भावनांमुळेच शक्य होत होता. माणूस त्याच्यापासून भीतीने पळ काढत होता किंवा त्वेषाने त्याच्याशी लढत होता. मात्र आजची संकटे ही अशी त्वेषाने लढून कमी होणारी नाहीत. त्यांच्यापासून बचाव करायचा असेल, तर जैविक भावना उपयोगी नाहीत. त्याकरिता ‘वैचारिक भावना’ आवश्यक आहेत. सध्याचे संकट टाळण्यासाठी, रोगाचा प्रसार कसा होतो हे बुद्धीने समजून घेऊन त्यानुसार उपाय योजायला हवेत, जगभरातील माणसांनी एकमेकांना सहकार्य करायला हवे. त्यासाठी एकमेकांविषयी विश्वास वाटायला हवा. विश्वास ही जैविक भावना नाही, दुसऱ्या पातळीवरील वैचारिक भावना आहे. या पातळीवर परस्परविरोधी भावना एकाच वेळी मनात असू शकतात. जैविक पातळीवरील भावना प्रतिक्रिया म्हणून तात्काळ निर्माण झालेल्या असल्याने त्या तत्क्षणी कृती करायला लावतात. मात्र वैचारिक भावना त्या तुलनेत संथ असतात, एकाच वेळी विश्वास व संशय या परस्परविरोधी भावना मनात असू शकतात. यातील एका भावनेला बळ देऊन त्यानुसार कृती करणे म्हणजे ‘विवेकबुद्धी’ होय.

ती विकसित करण्यासाठी पातंजली योगसूत्रात मार्गदर्शक तत्त्व सांगितले आहे. त्यानुसार दुसरी व्यक्ती चांगले काम करीत असेल तर त्याबद्दल संतोष बाळगावा; वाईट काम करीत असेल तर त्याला फार महत्त्व देऊ नये. दुसऱ्या व्यक्तीला सुख मिळत असेल तर त्याचा मत्सर न करता मैत्री करावी आणि तो दु:खी असेल तर मनात करुणा भाव ठेवून ते दु:ख दूर करण्याचे प्रयत्न करावेत. या साऱ्या दुसऱ्या पातळीवरील भावना या विचार बदलवून प्रयत्नपूर्वक मनात रुजवता येतात. त्या रुजवल्या व कृतीत आणल्या तरच माणसा-माणसांतील नाते दृढ होते. समान ध्येय निश्चित करून संघटित प्रयत्न होतात. या पातळीवर सहकारी असतात, तसे स्पर्धक आणि शत्रूदेखील असतात.

तिसऱ्या पातळीवरील उन्नत भावना मात्र संघटना आणि शत्रू-मित्रत्वाच्या सीमा ओलांडून जातात. कृतज्ञता, क्षमा, सर्व प्राणिमात्रांविषयी करुणा.. अशा उन्नत भावना मनात काही वेळ धरून ठेवणे याला ‘करुणा ध्यान’ म्हणतात. ध्यानाचे शरीरावर काय परिणाम होतात, याचे संशोधन सध्या मोठय़ा प्रमाणात होत आहे.

yashwel@gmail.com