सुनीत पोतनीस

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वांशिक व धार्मिक विद्वेषामुळे चाललेल्या रक्तरंजित दंगली आणि सरकारातील अंतर्गत बेबनाव यामुळे स्वातंत्र्य मिळालेल्या युगांडातील राजकीय व आर्थिक परिस्थिती हाताबाहेर गेली होती. १९६६ साली युगांडाचे पंतप्रधान ओबोटे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ आणि बुगांडा प्रदेशाचा राजा यांच्यातील सत्तास्पर्धेने कळस गाठला. ओबोटे यांनी राज्यघटनाच बरखास्त करून उपराष्ट्राध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष ही नामधारी पदे रद्द केली. पुढच्याच वर्षी ओबोटेंनी नवीन राज्यघटना तयार करून नवीन प्रजासत्ताक सरकार जाहीर केले आणि ओबोटे हे या प्रजासत्ताकाचे स्वघोषित अध्यक्ष बनले. १९६७ ते १९७१ या काळात ओबोटेंनी राजकीय विरोधकांना नमवून काही काळ शांतता प्रस्थापित केली असली तरी असंतोष धुमसतच होता. आणि ही पुढे येणाऱ्या एका मोठय़ा वादळापूर्वीची शांतता ठरली!

१९७१ साली आलेल्या या वादळाचे नाव होते- इदी अमीन! ब्रिटिश सैन्यात सैनिक म्हणून भरती झालेला इदी अमीन पुढे स्वतंत्र युगांडाच्या लष्करात मेजर जनरल या पदापर्यंत पोहोचला. १९७१ साली त्याने सरकारविरुद्ध लष्करी उठाव करून मिल्टन ओबोटे यांचे सरकार उलथवून युगांडाची सत्ता हातात घेतली. १९७१ ते १९७९ या काळात इदी अमीन युगांडाचा लष्करी हुकूमशहा आणि तिसरा राष्ट्राध्यक्ष होता. पुढे त्याने स्वत:ला ‘फिल्ड मार्शल’ या पदी बढती घेतली.

इदी अमीनने आपली सत्ता बळकट करण्यासाठी  जनतेवर केलेल्या अत्याचारांना आफ्रिकेच्या इतिहासात तोड नाही. त्याची तुलना होऊ शकेल असा दुसरा हुकूमशहा म्हणजे कंबोडियाचा पोलपॉट! अमीनने आपल्या अधिकारांचा गैरवापर करून केलेल्या विवादास्पद राजकीय हत्या, राजकीय बंदिवास, मानवी मूल्यांची तुडवणूक यामुळे त्याची कारकीर्द ही युगांडाच्या इतिहासातील काळा कालखंड समजला जातो. त्याने आठ वर्षांच्या काळात चार ते पाच लाख लोकांची हत्या केली. विशेष म्हणजे अमीनच्या देशबांधवांच्या या हत्याकांडास लिबियाचा अल-गद्दाफी, सोव्हिएत संघ व पूर्व जर्मनीचा पाठिंबा होता. अखेरीस युगांडातील असंतोष आणि १९७८ मध्ये युगांडा-नायजेरिया युद्धातील युगांडाचा दारुण पराभव यामुळे अमीन सौदी अरेबियाच्या आश्रयाला जाऊन एक निर्वासित म्हणून मरण पावला, आणि युगांडा जणू पुन्हा एकदा ‘स्वतंत्र’ झाला!

sunitpotnis94@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on idi amin uganda abn