– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्पना करता येणे हे माणसाच्या मेंदूचे वैशिष्टय़ आहे. कल्पना म्हणजे विचारच असतात. कोणताही निर्णय घेतला की त्याचे कोणकोणते परिणाम होतील याचा विचार या कल्पनाच असतात. कारण हे सारे परिणाम भविष्यात होणार असतात. माणूस असे भविष्याचे चांगले/वाईट चित्र कल्पनेने रंगवू शकतो तसेच वर्तमानात अस्तित्वात नाही अशा गोष्टी कल्पनेने अनुभवू शकतो. याची सुरुवात अगदी लहानपणी होते. भातुकली किंवा डॉक्टर-पेशंट असे खेळ मुले कल्पनाशक्ती वापरून खेळू शकतात. मेंदूच्या विकासासाठी लहानपणी असे कल्पनेत रमणे आवश्यक असते. मुलांच्या मनात काल्पनिक साथीदार असतात. हे साथीदार टीव्ही कार्टून शोमधील पात्रे असली तरी चालतील पण मुलांनी स्वत: कल्पना करायला हव्यात. भविष्यात स्मरणशक्तीची सारी कामे संगणक करू लागेल, पण त्याला कल्पनाशक्ती शिकवणे कठीण आहे असे कृत्रिम बुद्धिमत्तातज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे कल्पना करता येणे हे माणसाचेच वैशिष्टय़ राहणार आहे. चांगल्या कल्पनाच जग बदलू शकतात. सारे तंत्रज्ञान, साहित्य आणि कला यांच्यासाठी कल्पनाशक्तीच महत्त्वाची असते. ती प्रयत्नपूर्वक विकसित करता येते. त्यासाठी विचारांची लवचीकता आवश्यक असते. चौकटीबाहेरील विचारांना हे ‘चुकीचे’ किंवा अतार्किक विचार आहेत अशी प्रतिक्रिया न देता साक्षीभाव ठेवून पाहत राहिल्याने नवीन कल्पना सुचू शकतात. अशा कल्पनाच सर्जनशीलतेसाठी आवश्यक असतात. मेंदूतज्ज्ञांच्या मते कोणतीही नवीन कल्पना सुचण्यासाठी त्याविषयीची माहिती मेंदूत स्मरणशक्तीमध्ये असावी लागते.  मेंदूतील तार्किक विचार करणाऱ्या भागाला विश्रांती मिळत असताना नवीन कल्पना सुचतात. याला मेंदूतज्ज्ञ ट्रान्झियंट हायपोफ्रंटॅलिटी- ‘विचार करणाऱ्या भागाची काही वेळ निष्क्रियता’ म्हणतात. स्वप्ने पडत असताना अशी स्थिती असते, त्यामुळे अनेक नवीन कल्पना स्वप्नात सुचू शकतात. एखादी शारीरिक कृती सजगतेने करतानादेखील मेंदूची अशी स्थिती असते. ‘दि पॉवर ऑफ अनफोकस्ड माइंड’ पुस्तकाचे लेखक श्रीनी पिल्लईसारखे अनेक मेंदूशास्त्रज्ञ स्वत: ही पद्धत वापरतात. काही वेळ एकाग्रतेने एखाद्या समस्येचा विचार करणे, नंतर काही वेळ मनाला मोकळे सोडणे अशा सरावाने कल्पनाशक्तीचा विकास होतो.

yashwel@gmail.com