– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माणूस कल्पनेने जे पाहतो त्याचा परिणाम त्याच्या मेंदूत आणि शरीरात दिसतो. स्नायूंचा व्यायाम करत आहे असे कल्पनेने पाहिले तर त्या स्नायूत विद्युत ऊर्जा वाढते. ती यंत्राने मोजता येते. मात्र हा परिणाम २० मिनिटेच टिकतो. म्हणजे स्नायू बळकट करायचे असतील तर जोर मारतो आहे अशी कल्पना केली आणि नंतर जोर मारले तर अधिक जोर मारले जातात. पण कल्पना करून प्रत्यक्ष जोर मारलेच नाहीत तर मात्र स्नायू बळकट होणार नाहीत. एखादे दृश्य पुन:पुन्हा पाहिल्याने वास्तवात तसे घडत नाही. ‘थिंक अ‍ॅण्ड ग्रो रिच’ हे पुस्तक कितीही लोकप्रिय असले तरी, केवळ विचार करून कुणीही श्रीमंत होत नाही. त्या पुस्तकातही तसे म्हटलेले नाही. मात्र आपले भविष्य कसे असायला हवे, हे कल्पनेने पाहणे हिताचे असते.

असे कल्पना-दृश्य पाहिल्याने प्रयत्नांची दिशा स्पष्ट होते. ध्येयाचे स्मरण राहते, त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. त्याकरिता स्वत:च्या स्वप्नांचे कल्पनादर्शन करायला हवे. नक्की काय साधायचे आहे, याचा विचार त्यामुळे होतो. वजन कमी करण्यासाठीही कल्पनादर्शनचा उपयोग दोन पद्धतींनी करून घेता येतो. स्वत:ला स्वत:ची काया कशी दिसणे अपेक्षित आहे ते रोज कल्पनेने पाहायचे. स्वत:ची वजन कमी झालेली प्रतिमा- पोट कमी झाल्याने, कंबर बारीक झाल्याने आपण कसे छान दिसतो आहोत, याचे कल्पनादर्शन रोज पाच मिनिटे करायचे. नंतर खराखुरा व्यायाम करायचा.

आहाराचे प्रमाण कमी करण्यासाठीही कल्पनादर्शनचा उपयोग होतो. जे पदार्थ अधिक खाल्ले जातात, पण खाणे योग्य नाही असे आपल्याला माहीत असते; ते पदार्थ आपण खात आहोत अशी कल्पना करून त्याची चव अनुभवायचीच, पण तृप्तीही कल्पनेने अनुभवायची. बटाटेवडा आवडता असेल तर भरपूर वडे खाऊन पोट भरले आहे, आता आणखी एक घासही खाल्ला जाणार नाही, असे कल्पनादर्शन वारंवार करायचे. असे केल्याने प्रत्यक्ष खाण्याची इच्छा कमी होते. मात्र खाण्याच्या पदार्थाचे कल्पनादर्शन केले, त्यांची छायाचित्रे पाहिली, पण तृप्तीची कल्पना केली नाही तर उलट परिणाम होतो. ते पदार्थ खाण्याची इच्छा वाढते. माणूस कल्पना करतो त्यानुसार शरीरात रसायने बदलतात. तृप्तीची कल्पना केली की भूक निर्माण करणारी रसायने कमी होतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायामाच्या जोडीला कल्पनादर्शनही उपयोगी आहे.

yashwel@gmail.com