– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माणूस डोळे बंद करून प्रत्यक्षात समोर नसलेले एखादे दृश्य किंवा प्रतिमा कल्पनेने पाहू शकतो. अशा दृश्यावर किंवा प्रतिमेवर लक्ष एकाग्र करण्याचे ध्यान हा ध्यानाचा तिसरा प्रकार आहे. यामध्ये जी कल्पना निवडतो त्याचा मेंदूवर परिणाम होतो, हा भाग महत्त्वाचा असल्याने एकाग्रता ध्यानापेक्षा हे ध्यान वेगळे मानले जाते. लिंबाचे ध्यान केले की तोंडात लालास्राव होतो, त्याचप्रमाणे शरीरमनाला शांतता स्थितीत ठेवणाऱ्या कल्पना मानसिक तणाव कमी करतात. रामरक्षा, अथर्वशीर्ष यामध्ये राम, गणेश यांच्या रूपाचे कल्पनादर्शन आहे. मानसपूजा हेही कल्पनादर्शन आहे. अशी पूजा करताना कल्पनेने पाचही ज्ञानेन्द्रियांचा अनुभव घेता येतो. डोळे बंद ठेवून प्रतिमा म्हणजे रूप पाहायचे; कल्पनेने शंखध्वनी किंवा घंटानाद ऐकायचा; धूप, अगरबत्ती यांचा गंध कल्पनेने जाणायचा; गंध लावताना किंवा आचमन घेताना होणारा स्पर्श कल्पनेने अनुभवायचा आणि प्रत्यक्ष नैवेद्य न खाता त्याची चव कल्पना करून अनुभवायची.

आधुनिक संशोधनात असे दिसते आहे की, प्रत्येक माणसाची वेगवेगळ्या ज्ञानेन्द्रियांची कल्पना करण्याची क्षमता वेगवेगळी असते. कोणाला प्रतिमा सहजतेने पाहता येतात, तर कोणाला आवाज अधिक स्पष्ट ऐकू येतो; कोणी एखाद्या कृतीचा अनुभव कल्पना करून अधिक चांगला घेऊ शकतो. कल्पनेने असा कृतीचा अनुभव घेण्याचे तंत्र क्रीडा मानसशास्त्रात वापरले जाते. एखादी कृती प्रत्यक्ष न करताही ती करत आहोत अशी कल्पना केली, तर स्नायूंची स्मृती विकसित होते. प्रतिक्षिप्त क्रियेने स्नायू ती कृती वेगाने, सहजतेने करू लागतात. त्यामुळे अ‍ॅथलेटिक्स, जिम्नॅशियम याचप्रमाणे नृत्य, भाषण यांचा सरावही कल्पना करून करता येतो.

अशी कल्पना केल्याने त्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये, स्नायूंमध्ये परिणाम दिसून येतात हे विज्ञानाने मान्य केले आहे. मात्र असे परिणाम बाह्य़ वातावरणावर होतात, हे विज्ञानाला मान्य नाही. त्यामुळे माझ्याकडे खूप पैसे आहेत असे केवळ कल्पनादर्शन ध्यान करून एखादा माणूस श्रीमंत होणार नाही! त्यासाठी त्याला प्रत्यक्ष मेहनत करावीच लागेल. कल्पनादर्शन ध्यानाचा उपयोग ध्येयाची दिशा निश्चित करून त्याचे स्मरण ठेवण्यासाठी होऊ शकतो. त्याला अनुकूल असे बदल शरीर-मनात होऊ लागतात, हे लक्षात ठेवून या ध्यानाचा उपयोग करायला हवा.

yashwel@gmail.com