डॉ. यश वेलणकर
मानसोपचारात वर्तन चिकित्सक (बिहेव्हिअर थेरपिस्ट) यांचा प्रभाव खूप काळ होता. ते प्राण्यांवर प्रयोग करून सिद्धांत मांडत असत. त्यांच्या मते, मन ही संकल्पनादेखील ‘अंधश्रद्धा’ होती. माणसाचे किंवा कोणत्याही प्राण्याचे वर्तन पाहता येते, मोजता येते. मन असे मोजता येत नाही, त्यामुळे त्याचा विचार अवैज्ञानिक आहे. वर्तनातील विकृती लक्षात घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न म्हणजेच वर्तनचिकित्सा होय. ‘फोबिया’ म्हणजे ठरावीक गोष्टींची भीती. हे वर्तन उपचारांनी बदलता येते. यांचे सारे प्रयोग एखादी घटना (स्टिम्युलेशन) आणि त्यास दिली जाणारी प्रतिक्रिया यांचे परीक्षण करणारे होते. सारे वर्तन हे प्रतिक्रिया स्वरूपात असते आणि वातावरण बदलून ते बदलता येते. त्यासाठी मन ही न पाहता येणारी संकल्पना मानण्याची काहीही आवश्यकता नाही, असे या मंडळींचे आग्रही प्रतिपादन होते. सर्व शास्त्रीय जगतावर या वर्तनवादी शास्त्रज्ञांचा प्रभाव होता. मात्र, त्याच वेळी त्यांना विरोध करणारेही काही सूर उमटत होते. त्यात ‘गेस्टाल्ट सायकोलॉजी’चा सिद्धांत मांडणारे जर्मनीमधील शास्त्रज्ञ होते. त्यांच्या मते, कोणत्याही गोष्टीचा तुकडे करून विचार करणे चुकीचे असते. अनेक घटकांचा एकत्रित परिणाम हा त्या स्वतंत्र घटकांच्या बेरजेपेक्षा वेगळा असू शकतो. म्हणजे पानाचा विडा खाल्ल्यानंतर जो अनुभव येतो, तसाच अनुभव त्या विडय़ातील पान, सुपारी, कात, चुना हे पदार्थ एकानंतर एक असे खाल्ले तर येणार नाही. असेच माणसाचे वर्तनही गुंतागुंतीचे असते. घटना एकच असली तरी तिचे आकलन कसे झाले आहे, त्यानुसार वर्तन बदलते. एखाद्या माणसाला बुद्धिबळ खेळाविषयी काहीच माहिती नसेल तर त्याला पट आणि त्यावर मांडलेल्या सोंगटय़ा दाखवल्यानंतर त्याचे वर्तन एक प्रकारचे असेल, पण त्याला बुद्धिबळ खेळाची माहिती दिल्यानंतर, पटावर तीच स्थिती मांडलेली असली तरी त्याचे वर्तन बदलू शकते. तो पुढील चाल सुचवू शकतो. म्हणजे घटना आणि बाह्य़ वातावरण तेच असूनही वर्तन बदलले; कारण आंतरिक वातावरण बदलले. हे आंतरिक वातावरण म्हणजेच मन होय. हे आंतरिक वातावरण मुख्यत: विचार आणि भावना या घटकांनी बनलेले असते. या आंतरिक वातावरण सिद्धांताचा प्रभाव मानसोपचार पद्धतीवर त्यानंतर कायम राहिला आहे. त्यामुळेच व्यक्ती म्हणजे तिच्या भावना, विचार आणि वर्तन अशा तीन घटकांचा विचार १९६०च्या दशकापासून केला जाऊ लागला.
yashwel@gmail.com