– डॉ. यश वेलणकर
माणसाला मनासारखे झाले की आनंदी वाटते. मात्र आधुनिक काळात आनंद या भावनेविषयी काही गैरसमजुती वाढल्या आहेत. आनंदी नसणे हा अपराध किंवा अपयश आहे असे बऱ्याच जणांना वाटते. याचे दोन परिणाम होतात. सतत आनंदी वाटावे यासाठी ही माणसे सतत कशात तरी गुंतून राहतात. कामे, शॉपिंग, खाणेपिणे किंवा करमणूक, खेळ, गाणी, काही ना काही सतत चालू असते. एकटे असलो तर समाजमाध्यमांत गुंतून राहायचे आणि समूहात असताना आनंदी असल्याचा मुखवटा (मास्क लावल्यासारखा) सतत चेहऱ्याला बांधून ठेवायचा. मनातील दु:ख, चिंता, अस्वस्थता कुणाकडेच व्यक्त करायची नाही. कारण असे व्यक्त झालो तर आपली दुसऱ्याच्या मनात असलेली प्रतिमा भंग पावेल, आपण अपयशी, दु:खी आहोत हे जगाला समजेल या भीतीने खोटेखोटे हसत राहायचे. अशा वागण्यामुळे औदासीन्य हा आजार वाढतो आहे असे शास्त्रज्ञांना वाटते. माणूस सतत काही तरी करीत राहतो त्या वेळी त्याच्या जागृत मनाला तो गुंतवून ठेवत असतो. पण मेंदूत जागृत मनाला जाणवत नाही अशा बऱ्याच घडामोडी होत असतात. मेंदूचा काही भाग शरीरात काय चालले आहे ते जाणून प्रतिक्रिया करीत असतो, काही भाग जुन्या साठवलेल्या गोष्टी धुंडाळत असतो, काही भाग स्पर्श जाणत असतो. मेंदूतील आणि शरीरातील रसायने सतत बदलत असतात, त्याचे परिणाम होत असतात. स्वत:ला सतत गुंतून ठेवणाऱ्या माणसाला मात्र या कशाचेच भान नसते. सुप्त मनात निर्माण होणाऱ्या साऱ्या नैसर्गिक भावना त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने साठत जातात आणि एक दिवस उद्रेक करतात. त्यामुळे चिंता,औदासीन्य,भीती विकृतीची पातळी गाठतात.
हे टाळायचे असेल तर रोज कामात असतानाही अधूनमधून शांत बसून मनात उमटणाऱ्या विचार आणि भावनांना जाणायला हवे. प्रतिक्रिया न करता, विचारांच्या प्रवाहात वाहून न जाता माणूस त्यांना जाणू शकतो त्या वेळी तो वेगळाच आनंद अनुभवू शकतो. हा साक्षीभावाचा आनंद असतो. मनाचा आनंद हवे ते मिळाले की होतो. साक्षीभावाचा आनंद अनुभवण्यासाठी काहीही मिळण्याची गरज नसते. मनातील विविध भावनांचे इंद्रधनू पाहण्याचा, आकाश होऊन मनातील ढगांचे रंग अनुभवण्याचा तो आनंद असतो. हा आनंद अनुभवण्याची क्षमता मानवी मेंदूत आहे, पण ती साक्षीध्यानाच्या सरावाने विकसित करावी लागते.
yashwel@gmail.com