– डॉ. यश वेलणकर
माणूस बोलताना सवयीने शब्द वापरतो, त्यानुसार त्याचे प्रोग्रामिंग होत असते. हे प्रोग्रामिंग बदलता येते, या सिद्धांतावर आधारित ‘न्यूरोलिन्ग्विस्टिक प्रोग्रामिंग (एनएलपी)’ नावाचे तंत्र १९७५ मध्ये रिचर्ड बॅण्डलर व जॉन ग्रिण्डर यांनी मांडले. त्याची माहिती ‘द स्ट्रक्चर ऑफ मॅजिक : अ बुक अबाऊट लँग्वेज अॅण्ड थेरपी’ या त्यांच्या पुस्तकात दिली आहे. त्यानुसार ‘मला हे शक्य नाही’ असे शब्द एखादी व्यक्ती वापरते, त्या वेळी ती स्वत:ला बंधने घालत असते. ‘हे केल्याशिवाय गत्यंतर नाही’ असे म्हणते, त्या वेळीही एका चौकटीत अडकते. हे बदलायचे असेल, तर स्वत:च्या भाषेकडे आणि त्यामधून व्यक्त होणाऱ्या विचारांकडे लक्ष द्यायला हवे. ही भाषा बदलली की माणसाची मानसिकता बदलते व त्याचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी होते.
एखादी यशस्वी व्यक्ती कशी बोलते, कशी वागते याचे निरीक्षण करून त्यानुसार आपले वागणे-बोलणे बदलले, तर त्या व्यक्तीला जे शक्य झाले ते दुसऱ्यालाही शक्य होऊ शकते. याला ‘मॉडेलिंग’ असे म्हणतात. या तंत्रामध्येही ‘अटेन्शन’ला खूप महत्त्व दिले जाते. त्यासाठी वर्तमान क्षणात मन आणून पंचज्ञानेंद्रिये देत असलेला अनुभव घ्यायचा. परिस्थिती सारखीच असली तरी हा अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो. कुणी आवाजाकडे अधिक लक्ष देतो, तर कुणाला स्पर्श अधिक सहजतेने समजतो. असेच लक्ष मनातील विचारांकडे आणि बोलताना वापरल्या जाणाऱ्या शब्दांवर द्यायचे. जाणवणारे विचार जागृत मनात असतात, पण सवयी सुप्त मनात असतात. भावनिक अस्वस्थता हीसुद्धा एक सवयच असते. ती बदलण्यासाठी ‘अँकिरग’ हे तंत्र वापरले जाते. मात्र त्यापूर्वी स्वत:चा स्वत:शी असलेला ‘रॅपो’ बदलावा लागतो. त्यासाठी स्वत:वर प्रेम करायचे, स्वत:च्या अनुभवांकडे अधिक लक्ष द्यायचे. ते शब्दात मांडायचे आणि तसे मांडताना काही शब्द स्वत:ला मर्यादा घालणारे असतील तर ते बदलायचे.
एनएलपी हे तंत्र सुरुवातीला नवीन मानसोपचार पद्धती म्हणून मांडले गेले, पण नंतर एनएलपी आणि हिप्नोसिस यांचा एकत्र उपयोग करून ‘एकाच सत्रामध्ये दहा मिनिटांत फोबिया किंवा डोळ्यांचा नंबर कमी करता येतो’ असे दावे केल्यानंतर या तंत्रावर ‘छद्म-विज्ञान’ अशी टीका होऊ लागली. मानसोपचार म्हणून मान्यता मिळण्यासाठी वैज्ञानिक संशोधनाला महत्त्व दिले गेले नाही, पण कार्यक्षमता वाढवण्यासाठीचे प्रशिक्षण म्हणून जगभर हे तंत्र लोकप्रिय झाले आहे.
– डॉ. यश वेलणकर
yashwel@gmail.com