गणित म्हणजे तर्क. गणित साधं असो की अवघड, ते आधी समजावून घ्यावं लागतं. समजलं की कोणत्या पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे, याचा विचार करावा लागतो. त्यानंतर काही एक अंदाज बांधून गणित सोडवायला सुरुवात करावी लागते. अतिशय पद्धतशीर किंवा पायरी-पायरीने गणित सोडवता यायला लागतं. एका वेळी अनेक घटकांचा विचार करावा लागतो, तरच गणित सोडवता येतं.अगदी हीच पद्धत कोणतीही समस्या सोडवण्याची असते. समस्या नक्की काय आहे, हे नीट समजावून घ्यावं लागतं. ती कशी सोडवायची या संबंधी विचार करून आवश्यक पावलं उचलावी लागतात. समजा, एखाद्या उपायाने यश आलं नाही, तर दुसऱ्या मार्गाचा विचार करावा लागतो.गणित सोडवणं आणि समस्या सोडवण्याची पद्धत सारखी असते. गणितात अनेकदा सूत्रं हाताशी असतात. तशी वास्तव जीवनात नसतात. दरवेळी नवं सूत्र तयार करावं लागतं. मात्र समस्येशी दोन हात करायचे तर आधी तर्क करावाच लागतो, ‘लॉजिक’ वापरावंच लागतं. गणिताचा रोजच्या व्यवहारात सहज वापर करणाऱ्या व्यक्ती किंवा गणिताशी ‘कम्फर्टेबल’ असणाऱ्या माणसांच्या मेंदूंचं न्यूरो-सायंटिस्टनी स्कॅनिंग केलं. तेव्हा लक्षात आलं की ज्या वेळी माणसांना गणितं सोडवायला दिली जातात, तेव्हा काही विशिष्ट क्षेत्रं उद्दीपित होत आहेत. ही दिलेली कामं ज्यांनीवेगात, अचूक केली, त्यांच्या मेंदूचं स्कॅनिंग केल्यावर लक्षात आलं की यांच्या मेंदूमध्ये ‘गणिती बुद्धिमत्ता’ आहे. (mathematical/logical intelligence) डॉ. हॉवर्ड गार्डनर हे संशोधनात म्हणतात की, गणिती बुद्धिमत्ता ही कमीजास्त प्रमाणात प्रत्येकाकडे असते. मात्र विशेषत्वाने ती गणितज्ञ, शास्त्रज्ञ, संख्याशास्त्रज्ञ, अभियंते यांच्याकडे असते. भूमितीचा वापर चित्रकलेत होतो, आर्किटेक्टना होतो, तंत्रज्ञानात होतो. या लोकांमध्ये गणिती बुद्धिमत्ता असते. या बुद्धिमत्ता जन्मजात असतात, त्यामुळे चौथी-पाचवीतली मुलगी भाजीविक्रेत्या आईबाबांसह पटापट तोंडी बेरीज- वजाबाक्या- गुणाकार करायला शिकते. अशांच्या मेंदूमध्ये पोस्टेरिअर पेरिएटल कॉर्टेक्स, व्हेण्ट्रो-टेम्पोरल ऑसिपिटल कॉर्टेक्स आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचं जाळं आकडेमोड, समस्या सोडवणं यात वेगाने काम करत असलेलं शास्त्रज्ञांना आढळलेलं आहे. गणिती बुद्धिमत्तेला या तीन क्षेत्रातलं जाळं जबाबदार असतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा