– डॉ. यश वेलणकर
माणूस नवीन भाषा शिकतो त्या वेळी शब्दांचे अर्थ स्मरणात ठेवू लागतो. मेंदू परिसरात आणि शरीरात जे काही चालले आहे ते जाणतो, स्मरणशक्तीमध्ये त्या संदर्भात काही साठवलेले असेल तर त्यानुसार या क्षणाच्या अनुभवाचा तो अर्थ लावतो आणि प्रतिक्रिया करतो. शरीरातील संवेदनांचाही तो अर्थ लावतो आणि प्रतिक्रिया देतो. आत्ता शरीरात जे काही होते आहे त्याला भूक म्हणतात हे लहान बाळाला हळूहळू शिकावे लागते. मात्र शरीरातील संवेदनाचा अर्थ लावण्यात मेंदूची काही वेळा चूक होऊ लागते.
उदाहरणार्थ, मानसिक तणाव असेल, कंटाळा आला असेल तर भुकेची संवेदना चुकीची जाणवू शकते; म्हणजे शरीराला ऊर्जेची गरज नसताना भूक लागली असे वाटते आणि खाल्ले जाते. काही माणसांना ‘शौचास होते आहे’ ही संवेदनाही चुकीची जाणवते. तसे वाटते पण तेथे गेल्यानंतर प्रत्यक्षात होतच नाही. ‘इर्रिटेबल बॉवेल सीण्ड्रोम’ नावाच्या मानसिक तणावामुळे होणाऱ्या विकाराचे हे एक लक्षण आहे. आपल्या पोटात आतडय़ाच्या हालचाली होत असतात, त्यांचा आवाज आणि संवेदना काही वेळा जाणवते. त्यामध्ये चिंता करण्यासारखे काही नसते. छातीत धडधड होणे हीदेखील एक संवेदनाच आहे, प्रत्येक वेळी तिचा अर्थ ‘हार्टअॅटॅक’ आला असाच होत नाही. भीतीने किंवा उत्तेजित झाल्यानेही छातीत धडधडते.
साक्षीभावाच्या सरावाने मेंदूत जो काही चुकीचा अर्थ साठवला गेलेला असतो, तो बदलता येतो. छातीतील धडधड ही वाईटच आहे असा अर्थ मेंदूत साठवलेला असतो. जागृत मनाला ती धडधड जाणवली नाही तरी हृदयाचे ठोके वाढले हे मेंदूला समजते, तो चुकीचा अर्थ लावतो, प्रतिक्रिया करतो आणि भीती वाढत जाते. सजगतेच्या नियमित सरावाने ही धडधड जाणवू लागली की तिला प्रतिक्रिया करायची नाही, ती कुठे जाणवते ते उत्सुकतेने पाहायचे. असे केल्याने ‘धडधड वाईट’ हा मेंदूत साठवलेला अर्थ आपण बदलत असतो. त्यामुळे शरीरातील संवेदना जाणणे आणि त्यांना प्रतिक्रिया न करता त्यांचा स्वीकार करणे, असा सराव हा मेंदूत साठवलेले चुकीचे अर्थ बदलणे आहे. शारीरीक आणि मानसिक आरोग्यासाठी तो उपयुक्त आहे. त्यामुळे मानसिक तणाव आणि चिंता कमी होते.
yashwel@gmail.com