– डॉ. यश वेलणकर
ध्यानाच्या अभ्यासाने कार्यक्षमता वाढते, मानसिक तणाव कमी होतो, मनाच्या जखमा बऱ्या होतात, हे अनुभवल्याने अनेक मोठमोठय़ा कंपन्यांचे संचालक आणि व्यवस्थापक साक्षीध्यान करू लागले आहेत. शरीर-मन निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम, स्नान आवश्यक आहे, त्याचप्रमाणे ध्यानदेखील आवश्यक आहे. ध्यान ही ऐहिक क्रिया आहे, हे या श्रीमंत बुद्धिमान माणसांनी जाणले आहे. ‘लिंक्डइन’चे सीईओ जेफ विनर, ‘व्होल फूड्स’चे सीईओ जॉन मॅकी, ‘ट्विटर’चे सहनिर्माते इवान विल्यम्स आणि जगातील सर्वात मोठय़ा हेज फंडचे निर्माते रे डॅलिओ यांच्यामध्ये एक गोष्ट समान आहे. आपल्या अतिशय व्यग्र दिनक्रमातही ते ध्यानासाठी वेळ काढतात.
‘सिस्को’ कंपनीच्या पद्मश्री वॉरिअर यादेखील रोज रात्री ध्यानासाठी वेळ काढतात. त्या या कंपनीत तंत्रज्ञान प्रमुख आहेत आणि २२ हजार कर्मचारी त्यांच्या हाताखाली काम करतात. ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले आहे की,‘‘संगणक जसा ‘रीबूट’ करावा लागतो, तसाच आपला मेंदूदेखील ‘रीबूट’ करण्याची आवश्यकता असते. ध्यानाने ते होते, त्यामुळेच मी हा कारभार कोणत्याही तणावाला बळी न पडता सांभाळू शकते.’’ ‘फोर्ड मोटार’चे अध्यक्ष बिल फोर्ड हेही ध्यानाचे प्रसारक आहेत. ते म्हणतात : ‘‘ध्यानामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना वाढलीच, पण मी स्वत:ला माझ्या गुणदोषांसह स्वीकारले.’’
कंपनीमध्ये ध्यानासाठी वेळ देणारी ‘फोर्ड मोटार’ ही एकच कंपनी नाही. ‘गूगल’, ‘फेसबुक’, ‘अॅपल’, ‘आयबीएम’ अशा अनेक कंपन्यांनी ध्यानासाठी कार्यालयातच खास जागा ठेवली आहे. ‘गूगल’ ही इंटरनेट सर्चमधील सर्वात नावाजलेली कंपनी; पण ‘इंटरनेट सर्च’इतकाच स्वत:च्या मनाचा शोधदेखील महत्त्वाचा आहे, हे या कंपनीच्या प्रमुखांना मान्य आहे. त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी ‘सर्च इनसाइड युअरसेल्फ’ (तुमच्या अंतर्विश्वाचा शोध घ्या) या नावाचा एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. दुर्दैवाने भारतीय कंपन्यांतील प्रमुख अजूनही ध्यान हे ‘आध्यात्मिक’ समजत असल्याने, कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि मनातील जखमा भरून येण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो, हे समजून घेत नाहीत. ‘माइंडफुलनेस’शी त्यांची ओळख झाली की हे चित्र बदलू लागेल!
yashwel@gmail.com