– डॉ. यश वेलणकर
‘कॉग्निटिव्ह थेरपी’ अर्थात चिंतन चिकित्सेमध्ये औदासीन्याच्या रुग्णातील नकारात्मक विचारांना बदलले जाते. ‘मी अपयशी आहे’ हा औदासीन्याला कारणीभूत असलेला विचार लक्षात आला, की त्या विचाराला आव्हान देऊन तो बदलण्याचे तंत्र शिकवले जाते. ‘मी सतत अपयशी नाही, मला काही वेळा यश मिळाले आहे,’ असा विचार करून नकारात्मक विचार बदलवण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रक्रियेमध्ये विचारातील आशयाला महत्त्व असते. मात्र या उपचार पद्धतीला काही मर्यादा आहेत, असे ही चिकित्सा करणाऱ्या डॉक्टरांना जाणवत होते. ‘माइंडफूलनेस’ म्हणजे साक्षीध्यानाचा परिचय झाल्यानंतर यातील तंत्रे मानसोपचारात वापरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ‘डायलेक्टिकल बिहेव्हिअर थेरपी (डीबीटी)’, ‘अॅक्सेप्टन्स अॅण्ड कमिटमेंट थेरपी (एसीटी)’, ‘माइंडफूलनेस-बेस्ड् कॉग्निटिव्ह थेरपी (एमबीसीटी)’ अशा अनेक मानसोपचार पद्धती विकसित झाल्या.
ध्यानावर आधारित या चिकित्सा पद्धतींनुसार- ‘मी अपयशी आहे’ हा विचार केवळ ‘विचार’ आहे; ते सत्य असेलच असे नाही, हा समज वाढविला जातो. मनात येणारे सारे विचार खरे नसतात. त्यामुळे त्यांना नकारात्मक-सकारात्मक अशी प्रतिक्रिया करण्याची सवय आवश्यक नाही. ही प्रतिक्रियाच औदासीन्याला कारणीभूत असते. विचारांकडे साक्षीभावाने पाहण्याच्या सरावाने ‘डिप्रेशन’ कमी होऊ लागते. या पद्धतींमध्ये विचारातील आशयाला, अर्थाला महत्त्व दिले जात नाही; तर एकाला जोडून एक, अनेक विचार कसे येतात, ती प्रक्रिया तटस्थपणे पाहिली जाते.
चिंता वा उदासी ही भूतकाळ व भविष्यकाळाच्या विचारांमुळेच येत असते. ध्यानाचा अभ्यास हा वर्तमानात जगण्याचा सराव असल्याने या दोन्ही प्रकारच्या विचारांना फारसे महत्त्व देणे आवश्यक नाही याचे भान येते. आधुनिक काळात युरोप आणि अमेरिकेत ‘क्लिनिकल डिप्रेशन’ हा आजार वेगाने वाढत आहे. केवळ औषधांनी हा आजार पूर्णत: बरा होण्याचे प्रमाण कमी आहे. हा आजार पुन:पुन्हा डोके वर काढतो. म्हणूनच ध्यान चिकित्सा तेथील मानसोपचारतज्ज्ञांना एक आशेचा किरण वाटते आहे. सत्त्वावजय चिकित्सा ही अशीच ध्यानाचा उपयोग करून केली जाणारी मानसोपचार पद्धती आहे, पुन:पुन्हा येणारे ‘डिप्रेशन’ तिने टाळता येते.
yashwel@gmail.com