– डॉ. यश वेलणकर
शरीराला जखम झाली तर प्रथमोपचार म्हणून मलमपट्टी केली जाते. सर्दी-खोकला झाला, तर लगेच डॉक्टरकडे जाण्यापूर्वी घरगुती औषधे, काढा, चाटण घेतले जाते. हे शारीरिक प्रथमोपचार आहेत. पण शरीरावर आघात होतो, तसाच मनावरही होतो. त्याचे रूपांतर मानसिक आजारात होऊ द्यायचे नसेल, तर ‘मानसिक प्रथमोपचार’ ही संकल्पना रूढ व्हायला हवी. ‘डिप्रेशन’ आणि आत्महत्या यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, सामाजिक भान असलेल्या सर्व वयोगटांतील अधिकाधिक व्यक्तींनी या मोहिमेत सहभागी व्हायला हवे. मानसिक प्रथमोपचार म्हणजे उपदेश करणे नाही. सूचना करणे हाही प्रथमोपचार नाही. तर भावनांची सजगता वाढवणे हा प्रथमोपचाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.
आपला मेंदू प्रत्येक अनुभवाची चार प्रकारांत वर्गवारी करीत असतो. पण त्याची आपल्याला जाणीवच नसते. एखाद्या जखमेकडे दुर्लक्ष केले, ती स्वच्छ ठेवण्यासाठी योग्य काळजी घेतली नाही, तर ती जखम वाढत जाते. तसेच रोज, छोटय़ामोठय़ा कारणांनी येणाऱ्या अस्वस्थतेला जाणले नाही, तर ती अस्वस्थता मनाचे सारे व्यापार व्यापून टाकते. त्यामुळे चिंतारोग, औदासिन्य वाढू लागते. या ‘मूड डिसॉर्डर्स’ वाढू द्यायच्या नसतील, तर केवळ ‘बी पॉझिटिव्ह’ असा सल्ला देऊन भागत नाही. तसे करणे म्हणजे जखम स्वच्छ न करताच वरून टाके घालण्यासारखे आहे. आतील कचरा, पू काढला नाही, तर वरवरची मलमपट्टी करून कोणतीच जखम बरी होत नाही. भावनिक सजगतेने मानसिक जखमा स्वच्छ होतात. अशी सजगता वाढवायची म्हणजे दिवसभरात अनेक वेळा ‘आत्ता माझ्या मनात कोणत्या भावना आहेत’ त्याची नोंद करायची.
मेंदूच्या प्रतिक्रियेमुळे निवांतपण, उत्साह, काळजी आणि उदासीकडे झुकणारा कंटाळा या चार स्थिती स्वाभाविक आहेत. याला आपण ‘मूड्स’ म्हणू. दिवसभरात पाच-सहा वेळा तरी आत्ता माझा मूड या चारपैकी कोणत्या स्थितीत आहे, याची स्वत:शी नोंद करायला हवी. कोणतेही बाह्य़ कारण नसतानाही काळजी आणि उदासी असू शकते. काही घटना त्यामध्ये भर घालतात आणि या दोन्ही भावनांची तीव्रता, वारंवारता, कालावधी वाढवतात. अशा वेळी काय करायचे, याचे प्रशिक्षण मानसिक प्रथमोपचारामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना देता येईल. सजगतेचा सराव त्यामध्ये असेल. अशा व्यक्तींचे ‘नेटवर्क ऑफ वेलबीइंग’ विकसित करणे सध्या गरजेचे आहे.
yashwel@gmail.com