– डॉ. यश वेलणकर
स्वमग्नता कमी करण्यासाठी कोणतीही औषधे फारशी उपयोगी ठरत नाहीत. पण ‘ऑक्युपेशन थेरपी’ने त्रास कमी होतो. त्याबरोबर ‘माइंडफुलनेस थेरपी’मधील काही कौशल्ये ही मुले शिकली, तर त्यांचे ‘अटेन्शन’ सुधारते; दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधताना येणारा तणाव कमी होतो, असे संशोधनात दिसत आहे. नेदरलँडमध्ये झालेल्या एका प्रयोगात आठ ते १९ वर्षे वयाच्या ४५ स्वमग्न मुलांना आणि त्यांच्या पालकांना माइंडफुलनेस थेरपी दिली गेली. प्रत्येक आठवडय़ात दीड तास हे सर्व जण एकत्र येऊन माइंडफुलनेसचा सराव करीत होते. यामध्ये श्वासाची सजगता, शरीराकडे लक्ष देणे, शरीराच्या सजग हालचाली यांसारखे नेहमीचे प्रकार होते; पण ‘सजग संवाद’ हे एक विशेष ‘ट्रेनिंग’ होते. त्याचबरोबर रोजच्या कार्यक्रमात अचानक बदल घडवणे- म्हणजे ट्रेनिंगची खोली अचानक बदलणे, मुलांच्या ठरलेल्या जागा बदलणे आणि या बदलांमुळे येणाऱ्या तणावाला सजगतेने सामोरे जाणे, असे ट्रेनिंगही होते. रोज घरी सजगतेचा सराव पालक आणि मुले यांनी एकत्र बसून करायचा, मन वर्तमानात आणण्याची एकमेकांना आठवण करायची, रोजच्या अधिकाधिक कृती सजगतेने करायच्या आणि रोजचा अनुभव डायरीत लिहायचा, असा ‘होमवर्क’देखील होता. नऊ आठवडे असा सराव झाल्यानंतर या मुलांची आणि त्यांच्या पालकांची पुन्हा तपासणी केली. त्यानंतर दोन महिन्यांनी आणि पुन्हा एक वर्षांने तपासणी करून मुलांत व पालकांत झालेले फायदे नोंदवले.
ही थेरपी सुरू करण्यापूर्वी केलेल्या तपासणीत आणि थेरपी पूर्ण झाल्यानंतर केलेल्या मुलांच्या तपासणीत संवाद साधणे, भावनिक संतुलन आणि कृतीची सजगता या तीन गोष्टी सुधारल्याचे स्पष्ट झाले. हा परिणाम एक वर्ष झाल्यानंतरही टिकून राहिला. सर्वात जास्त फायदा मुलांच्या पालकांना झाला. त्यांचा मानसिक तणाव खूप कमी झाला, परिस्थितीचा स्वीकार करून आवश्यक ती कृती करण्याचे त्यांचे कौशल्य आणि त्यांच्या मुलांशी असलेले त्यांचे वागणे अधिक परिणामकारक झाले. आपल्याकडे सध्या स्वमग्न मुलांवर उपचार करणारी केंद्रे खूप कमी आहेत. अशी केंद्रे सुरू करणे गरजेचे आहे. ऑक्युपेशन थेरपीला ध्यानाची, अटेन्शन ट्रेनिंगची जोड मिळाल्यास मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि पालकांचा तणाव कमी होईल.
yashwel@gmail.com