– डॉ. यश वेलणकर
माणसाच्या मनात आपोआप विचार येतात. त्यांचे काही पॅटर्न, साचे असतात. काही तरी वाईट घडेल, हा सर्वाधिक आढळणारा साचा आहे. प्रवासाला निघताना ‘अपघात होईल’ असा विचार मनात ठाण मांडून बसतो. एखादी साथ आली की, ‘मला तो आजार होणारच’ असे वाटू लागते. या विचारांचे प्रमाण वाढले, की चिंतारोग, भीतीचा झटका असे त्रास होऊ लागतात. काही वेळा हे साचे ‘स्व’शी जोडलेले असतात. ‘मी प्रवास करीत असताना गाडी बिघडतेच’, ‘हवे असेल त्या वेळी कुणीच मदत करीत नाही’- असे विचार उदासीनतेकडे नेणारे असतात. ‘मी दुबळी आहे, मला एकटय़ाने फिरता येत नाही’- हा साचा अनेक स्त्रियांच्या मनात असतो. दुसऱ्या माणसाच्या देहबोलीचा अर्थ लावत असताना, तो ‘अंदाज’ आहे याचे भान राहिले नाही की मनात ‘स्टोरीज्’ तयार होतात. ‘तो बोलला माझ्याशी, पण ते तोंडदेखले होते’, ‘ती मला टाळायचा प्रयत्न करते आहे’- असे विचार म्हणजे दुसऱ्याचे मन मला वाचता येते आणि मला जे वाटते तेच सत्य आहे अशी खात्री असते.
आपल्या मनातील असे साचेबद्ध विचार कमी करायचे असतील, तर ज्ञानेंद्रिये कोणती माहिती देत आहेत आणि आपण त्याचा कोणता अर्थ लावीत आहोत, यामध्ये फरक करण्याचा सराव करायला हवा. उदाहरणार्थ, आपण एक पिशवी पाहिली. ही पिशवी आहे हे डोळ्यांना दिसत आहे. पण तिच्यात काय आहे, याचे मनात येणारे विचार या केवळ शक्यता आहेत. पिशवीत आपण समजतोय तेच असेल असे नाही, हे आपण लक्षात घेतो. तसेच दुसऱ्या माणसाला पाहिल्यानंतर- ‘तो मला टाळतो आहे.. थकलेला आहे.. कोणत्या तरी टेन्शनमध्ये आहे.. त्याला बरे वाटत नाही आहे..’ अशा अनेक शक्यता असू शकतात, हे लक्षात घ्यायला हवे.
स्वत:च्या शरीरात जे काही जाणवते, त्याचेही आपण असेच अर्थ लावतो. छातीत दुखू लागले, की ‘हा हार्टअॅटॅक आहे’ किंवा ‘गॅसने दुखते आहे’ या दोन्हीही शक्यता आहेत. आपणच त्याचे निदान करणे योग्य नसते. मनातील सारे विचार या शक्यता आहेत; तेच सत्य नाही, याचे भान राहिले की ठोकळेबाज विचारांची गफलत कमी होते. समुपदेशनामध्ये अशा साच्यांचे भान आणून देणे हे एक महत्त्वाचे ध्येय असते.
yashwel@gmail.com