– डॉ. यश वेलणकर
आजचा काळ हा एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा आहे. मुले गाणी ऐकत अभ्यास करतात. माणसे काम करता करता फोनवर बोलतात. कॉर्पोरेट कंपन्यांत काम करताना ‘मल्टी-टास्किंग’ करावेच लागते. मात्र, मेंदूच्या संशोधनानुसार एकाच वेळी अनेक ठिकाणी लक्ष देणे शक्य नसते. ‘मल्टी-टास्किंग’ करणारी व्यक्ती एका कामावरून दुसऱ्या कामावर लक्ष वेगाने नेत असते. असे करताना मेंदूला अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे तो तुलनेने लवकर थकतो, चुका करतो. आपल्या रोजच्या आयुष्यात एकाच वेळी अनेक कामे करणे अत्यावश्यक असेल आणि ते कमीत कमी चुका करत करायचे असेल, तर सजगतेचा सराव आवश्यक आहे. विशेषत: बौद्धिक कामे करताना हे अधिक महत्त्वाचे आहे.
याचे कारण आपल्या मेंदूच्या कार्यशैलीत आहे. आपला मेंदू काम करताना आधीच्या क्षणाची माहिती लगेच पुसून टाकत नाही. आपण एखादे दृश्य पाहतो, नंतर डोळे बंद केले तरी बंद डोळ्यांनी ते दृश्य दिसते, याला ‘आफ्टर इमेज’ म्हणतात. आपण बोललेली वाक्ये बोलणे थांबवले तरी मनात पुन:पुन्हा येत राहतात; एकच विचार मनात पुन:पुन्हा येत राहतो, यास हेच कारण आहे. आपला मेंदू प्रत्येक अनुभवाचा अर्थ लावतो आणि तो त्याला महत्त्वाचा वाटला तर स्मृतीमध्ये साठवून ठेवतो. मेंदूची कामाची हीच पद्धत ‘मल्टी-टास्किंग’ करताना त्रासदायक ठरते. त्यासाठीच एका कामाचा अनुभव पुसून टाकून दुसऱ्या कामावर लक्ष नेताना मेंदूला जास्त ऊर्जा खर्च करावी लागते.
सजगतेचा सराव नेमका येथेच उपयुक्त ठरतो. क्षणस्थ राहण्याचा सराव अधिक काळ केला, की ‘आफ्टर इमेज’ म्हणजे मनात तेच तेच विचार येण्याचा कालावधी कमी होतो. मेंदू मागील अनुभवात रेंगाळत न राहता वर्तमान क्षणातील माहिती घेण्यास सक्षम होतो. याचसाठी मन वर्तमानात आणण्याचा सराव शक्य असेल तेव्हा करायला हवा. भूतकाळात रेंगाळणाऱ्या मेंदूला पुन:पुन्हा वर्तमानात आणायला हवे. त्यामुळे आपण लक्ष त्वरित वर्तमान कृतीवर आणू शकतो आणि लक्ष वेगाने बदलू शकतो. म्हणजेच एकाच वेळी अनेक कामे- ‘मल्टी-टास्किंग’- करू शकतो. लक्ष देण्याचे कौशल्य आणि जे काही जाणवते त्याचा स्वीकार, असा दोन प्रक्रियांनी साक्षीभाव विकसित होतो. त्यातील पहिला टप्पा ‘मल्टी-टास्किंग’साठी उपयुक्त आहे.
yashwel@gmail.com