– डॉ. यश वेलणकर
मेंदूतील तरंग (वेव्ह) संपूर्ण मेंदूला व्यापून पुढील भागात पोहोचतो त्याच वेळी जागृत मनात तो विचार जाणवतो. असे जागृत मनापर्यंत न पोहोचलेले बरेच काही सुप्त मनात असते. माणसाचा मेंदू म्हणजे एक मोठ्ठी कंपनी आहे अशी कल्पना केली, तर मेंदूचा पुढील भाग हा व्यवस्थापकांच्या केबिनसारखा ठरेल. मेंदूचा अन्य भाग बरीच कामे करीत असतो. तो जगाची माहिती घेतो, शरीरात काय होते आहे ते जाणून त्याला प्रतिक्रिया करीत असतो. स्मृतींवर काम होत असते, भविष्याचे धोके जाणले जात असतात. या सर्व गोष्टींचे निवेदन व्यवस्थापकांना केले जाते. मात्र व्यवस्थापकीय केबिन खूप लहान आहे. तेथे एकाक्षणी एकच तरंग जाऊ शकतो. जो तेथे जातो तो विचार जागृत मनात येतो. तेवढय़ात दुसरा तरंग तेथे पोहोचतो, त्याचमुळे मनात विचारांची साखळी असते. काही विचार परस्परविरोधीही असतात, कारण मेंदूतील सुप्त मनाच्या पातळीवर अनेक कामे स्वतंत्रपणे होत असतात. एकाच मेंदूत जणू काही अनेक सुप्त मने असतात. व्यवस्थापनाचे काम त्यांच्यात सुसंगती निर्माण करणे हे असते. त्या कामाचा परिणाम म्हणजेच माणसाच्या मनात चालू असलेला स्वसंवाद असतो, तोच ‘मी-माझे’ हा भाव निर्माण करतो.
माणसाच्या जागृत मनातील हा स्वसंवाद त्रासदायक असतो त्या वेळी उदासी किंवा भीती निर्माण होते. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी दारू प्यावीशी वाटते, सतत स्वत:ला करमणुकीत किंवा कामात गुंतवून ठेवले जाते. मात्र या त्रासदायक विचारापासून सुटका मिळवण्यासाठी सतत गुंतून राहिले तरी सुप्त मनातून व्यवस्थापकीय मेंदूकडे जाणाऱ्या लहरी थांबलेल्या नसतात. त्या कधी तरी स्फोट घडवतात. डॅन हॅरिस यांनी ‘टेन पर्सेट हॅप्पिअर’ या त्यांच्या पुस्तकात अशाच अनुभवांचे वर्णन केले आहे. टीव्हीवर बातम्या सांगत असतानाच त्यांना अचानक भीतीचा झटका आला. अफगाणिस्तानमध्ये काम करीत असताना पाहिलेल्या हिंसक दृश्यांचा तो परिणाम असावा; त्या स्मृती नेणिवेत साठवलेल्या होत्या. हा ‘पॅनिक अॅटॅक’चा त्रास कमी करण्यासाठी त्यांनी केलेले विविध उपाय निरुपयोगी ठरले. पण साक्षीध्यानाच्या सरावाने त्यांचा त्रास कमी झाला. त्यांनी त्यांचे हे सारे अनुभव वरील पुस्तकात लिहिले असून त्याचे उपशीर्षक- ‘माझ्या डोक्यातील गोंगाट मी कसा कमी केला, ताण कमी करून कार्यक्षमता कशी कायम ठेवली-त्याची ही सत्यकथा’ असे आहे. साक्षीध्यानाने राग, भीती, उदासी अशा भावनांचा त्रास कमी करून आनंद अनुभवणे सर्वानाच शक्य आहे.
yashwel@gmail.com