– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधुनिक काळात सिग्मंड फ्रॉइड यांनी सुप्त मन ही संकल्पना लोकप्रिय केली. आपल्या जागृत मनाला समजत नाही असे बरेच काही मेंदूत घडत असते या अर्थी मेंदुविज्ञानाने ती मान्य केली आहे. एखादा सिग्नल संपूर्ण मेंदूत पसरतो, त्याचवेळी तो जागृत मनाला समजतो आणि विचार स्वरूपात प्रकट होतो. शरीरात सतत काहीतरी घडत असते पण ते जागृत मनाला समजत नाही. बाह्य वातावरणात असणाऱ्या सर्व गोष्टीदेखील जागृत मनाला समजत नाहीत. मात्र हे दोन्ही बदल ‘भावनिक मेंदू’ला ५० मिनी सेकंदांतच समजतात. तो त्याच्या पूर्वस्मृतीनुसार हे चांगले/ हे वाईट अशी प्रतिक्रिया करतो. त्यामुळे पुन्हा शरीरात बदल होतात. हे सारे बदल ३५० मिनी सेकंद टिकणारे नसतील तर जागृत मनाला समजत नाहीत. पण ते होत असतात. हेच सुप्त मन. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून टाचणी टोचली की बोट मागे घेतले जाते, मोठ्ठा आवाज आला की माणूस दचकतो हे देखील सुप्त मनाच्या पातळीवर होते. जैविक भावना म्हणजे राग, भीती, लैंगिक आकर्षण यांची निर्मिती सुप्तमनातच होते. ‘स्व’चे संरक्षण आणि वंशसातत्य यासाठी या भावना असतात, पुरुषाच्या शरीराचा ठरावीक गंध स्त्रीच्या सुप्त मनाला आकर्षक वाटतो. ठरावीक स्प्रे अंगावर मारला की मुली मागे लागतात अशी जाहिरात दाखवतात त्याचे मूळ यामध्ये आहे. वास्तविक, प्रत्येक स्त्रीसाठी तो गंध वेगळा असल्याने या जाहिराती अर्थातच चुकीच्या आहेत. माणसाच्या मनात विचार येतो त्यापूर्वी सुप्त मनात बरेच काही घडून गेलेले असते. लक्ष देण्याचा सराव जागृत मनाची व्याप्ती वाढवून सुप्त मन स्वच्छ करण्यासाठी आवश्यक आहे. माणूस शरीरावर पुन:पुन्हा लक्ष देऊ लागतो त्यावेळी शरीरात घडणारे पण पूर्वी न जाणवणारे बदल म्हणजेच संवेदना जागृत मनाला समजू लागतात. साक्षीध्यानाच्या सरावाने अशा संवेदना समजू लागणे ही प्रगतीची पहिली पायरी आहे. त्या संवेदनांना प्रतिक्रिया देणे ही भावनिक मेंदूची सवय आहे. जागृत मनाने ही प्रतिक्रिया करणे थांबवायचे, म्हणजे संवेदना स्वीकारायची, ही प्रगतीची महत्त्वाची दुसरी पायरी आहे. त्यामुळे असा सराव केला तरच सुप्तमनात मूळ असलेल्या सर्व विघातक भावना कमी होतात.

– डॉ. यश वेलणकर

yashwel@gmail.com