– डॉ. यश वेलणकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आहार विकृती’मध्ये अधिक खाणे- म्हणजे ‘बिंज ईटिंग’ हाही एक प्रकार आहे. ही मानसिक विकृती असलेली व्यक्ती पोटाला तडस लागेपर्यंत खाते. असे खाताना तिला समाधान होत नाही. आठवडय़ात किमान दोन वेळा असे होत असेल, तर त्यावर मानसोपचार घ्यावे लागतात. कारण असे खाणे हे एक लक्षण आहे; त्याचे मूळ कारण सुप्त मनातील असुरक्षिततेची भावना हे असते. बेभान होऊन खाणे हा त्रासदायक भावनांपासून पळून जाण्यासाठी त्या व्यक्तीला गवसलेला तो चुकीचा उपाय असतो. चिंता कमी करण्यासाठी काही जण दारू पितात, तसे ही व्यक्ती अधिक खाते. अर्थातच, अशा अतिरेकी खाण्याचे दुष्परिणाम होतातच. अपचन हे अशा व्यक्तीसाठी नेहमीचेच असते. अधिक खाल्ल्याने वजन वाढते आणि त्यामुळे होणारे सारे आजार होतात.

असे एका वेळी खूप खाणे हे बटाटा वडय़ासारख्या एखाद्या पदार्थाचे असू शकते किंवा जेवणातील सर्वच पदार्थ अधिक खाल्ले जातात. असा त्रास असलेली व्यक्ती खूप भराभर खाते. खाताना इतर माणसे बरोबर असतील तर ती अधिक खाण्याची चेष्टा करू लागतात, त्यामुळे ही व्यक्ती काही वेळा एकटय़ानेच खाणे पसंत करते. काही जण रात्री झोपेतून उठून खातात. भूक नसतानाही खाण्याची तीव्र इच्छा होते आणि त्या वेळी दुसरे काहीही सुचत नाही. खाऊन झाल्यानंतर अपराधीभाव आणि उदासी येऊ शकते. ‘डायग्नोस्टिक अ‍ॅण्ड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल’ या मानसिक विकृतीच्या निदानासाठी वापरल्या जाणाऱ्या पुस्तकात २०१३ साली या विकृतीला स्वतंत्र स्थान मिळाले आहे.

आहार कोणता आणि किती घ्यावा याबाबतचा सल्ला देऊन ही विकृती बरी होत नाही. कारण आपण अति खातो ते चुकीचे आहे हे त्या व्यक्तीला समजत असतेच; तरीही ती स्वत:ला थांबवू शकत नाही. कोणतेही व्यसन केवळ उपदेशाने बरे होत नाही; ती कृती न केल्याने येणाऱ्या अस्वस्थतेला कसे सामोरे जायचे याचे प्रशिक्षण व्यसनमुक्तीसाठी आवश्यक असते. तसेच या आहार विकृतीसाठीही ते आवश्यक असते. त्यामुळे या विकृतीला अति खाण्याचे व्यसन असेही म्हणता येते. दिवसभरात अधिकाधिक वेळा भावनांची नोंद करणे, मन अस्वस्थ असेल तेव्हा शरीरातील संवेदनांचा स्वीकार करणे, खात असताना सजग राहणे आणि विचार व कृती यांमध्ये फरक करण्यास शिकणे, याने ही विकृती बरी होते.

yashwel@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on overeating abn