डॉ. मानसी राजाध्यक्ष

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात हवेतल्या ऑक्सिजन, नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साइड या तीन मुख्य घटकांचा शोध लागला. आता हवेमध्ये या तीन घटकांव्यतिरिक्त आणखी काही आहे का, याचा इंग्लिश शास्त्रज्ञ हेन्री कॅव्हेंडिश याला शोध घ्यायचा होता. यासाठी इ.स. १७८५ मध्ये हेन्री कॅव्हेंडिश याने एक प्रयोग केला. त्याने एका बंद चंबूतल्या हवेमधले नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड हे तिन्ही घटक विविध विविध रासायनिक क्रियांद्वारे काढून टाकले. हे केल्यानंतरही, आता पाण्याने भरलेल्या या चंबूत वायूचा एक छोटासा बुडबुडा अजून दिसून येत होता. या बुडबुडय़ाचे आकारमान एकूण हवेच्या तुलनेत सुमारे ०.७ टक्के इतके होते. हा वायू कोणत्याही रासायनिक क्रियेत भाग घेत नव्हता. कॅव्हेंडिशने केलेल्या हवेतील या वायूच्या नोंदीनंतर शंभर वर्षांत या आघाडीवर काहीच घडले नाही.

इ.स. १८९२ मध्ये इंग्लंडच्या लॉर्ड रेले याने वायूंवरील आपल्या संशोधनाद्वारे वेगळाच शोध लावला. या शोधानुसार हवेतून वेगळ्या केलेल्या नायट्रोजनची घनता ही इतर कोणत्याही संयुगापासून मिळवलेल्या नायट्रोजनच्या घनतेपेक्षा अध्र्या टक्क्याने जास्त भरत होती. स्कॉटलंडचा रसायनतज्ज्ञ विल्यम रॅमसे याला या प्रयोगांची माहिती होती. कॅव्हेंडिशने एका शतकापूर्वी केलेला, हवेतून विविध घटकांना दूर करण्याचा प्रयोग विल्यम रॅमसे याने थोडय़ाशा वेगळ्या प्रकारे इ.स. १८९४ साली पुन्हा करून हवेतला हा निष्क्रिय वायू वेगळा केला. या वेळेपर्यंत रासायनिक विश्लेषणासाठी वर्णपटशास्त्राच्या वापराला सुरुवात झाली होती. हवेतल्या या निष्क्रिय वायूचा वर्णपट कोणत्याही ज्ञात वायूशी जुळत नव्हता. एका नव्या मूलद्रव्याचा शोध लागला होता! या वायूच्या निष्क्रियतेमुळे त्याला ऑर्गास (म्हणजे आळशी) या ग्रीक शब्दावरून अरगॉन हे नाव दिले गेले.

अरगॉनच्या शोधानंतर थोडय़ाच काळात रामसे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी वर्णपटशास्त्राच्या मदतीनेच युरेनियमच्या खनिजातल्या हेलियमचा, तर द्रवीभूत हवेतल्या निऑन, क्रिप्टॉन आणि झेनॉन या अरगॉनच्या कुटुंबीयांचाही शोध लावला. या कुटुंबाला त्यांच्या रासायनिक निष्क्रियतेमुळे ‘निष्क्रिय वायूंचा गट’ असे संबोधले जाऊ लागले. निष्क्रिय वायूंवरील या संशोधनाबद्दल विल्यम रॅमसे याला १९०४ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक आणि लॉर्ड रेले याला अरगॉनच्या शोधाबद्दल १९०४ सालचेच भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

Story img Loader