– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द्वंद्वात्मक मानसोपचार पद्धती ‘बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर’वर उपचार म्हणून सुरुवातीला विकसित झाली. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्गीकरण करण्याचे प्रयत्न प्राचीन काळापासून होत आहेत. आयुर्वेदात वात, पित्त व कफप्रधान प्रकृती असे वर्गीकरण; तसेच सत्त्वगुण प्रधान, रजगुण प्रधान व तमगुण प्रधान अशा मानस प्रकृतीही आहेत. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्गीकरण त्याचे शरीर, भावना, विचार करण्याची आणि वागण्याची पद्धत यांनुसार करता येते. यांना व्यक्तिमत्त्वाचे पैलू म्हणतात. आधुनिक काळात गॉर्डन ऑलपोर्ट यांनी व्यक्तिमत्त्व-निदर्शक अशा चार हजार शब्दांची यादी केली. त्यांचे विविध गट करून संगणकाच्या मदतीने विश्लेषण पद्धत १९९० नंतर विकसित झाली.

या विविध पैलूंचे पाच घटकांत वर्गीकरण केले जाते (हा फाइव्ह फॅक्टर सिद्धांत). त्यानुसार व्यक्तिमत्त्वाचे परीक्षण केले जाते. भावनांची अस्थिरता व संतुलन हा त्यातील पहिला घटक आहे. चिंता, भीती, राग, उदासी व लज्जा या भावना आणि त्यानुसार होणारे वर्तन यामध्ये पाहिले जाते. एखादी व्यक्ती लाजाळू आहे किंवा रागीट आहे असे आपण म्हणतो, तेव्हा आपल्या अनुभवानुसार हेच परीक्षण नकळत करीत असतो; मात्र भावनांचे विश्लेषण हा केवळ एक घटक आहे.  दुसरा घटक बहिर्मुखता व अंतर्मुखता हा आहे. एखादा माणूस सतत गप्पांत रमतो की माणसे टाळतो, एकटा राहणे पसंत करतो, याचा विचार यात होतो. व्यक्तिमत्त्वाचा तिसरा घटक वेगळ्या कल्पना आणि विचार यांना एखादा माणूस कसा प्रतिसाद देतो, त्याचे विश्लेषण करतो. काही माणसे सतत नावीन्याच्या शोधात असतात, काहींना मात्र स्थैर्य हवे असते. त्याचे मोजमाप या घटकाच्या परीक्षणात होते.

व्यक्तिमत्त्वाचा चौथा घटक इतरांशी जुळवून घेणे की स्वत:च्या मतांचा आग्रह धरणे, याच्याशी संबंधित आहे. पाचवा घटक स्वयंशिस्त व मनमौजीपणा यांचे मोजमाप करतो. कोणत्याही माणसाचे व्यक्तिमत्त्व कसे आहे, हे या पाच घटकांच्या आधारे ठरवता येते. वेगवेगळ्या संस्कृतींमधील हजारो माणसांना प्रश्न विचारून हे पाच घटक निश्चित केलेले आहेत. वयानुसार व्यक्तिमत्त्वातील काही घटक बदलतात, हेही स्पष्ट झाले आहे. व्यक्तिमत्त्व-विकृतीत यातीलच काही घटक विकृतीच्या पातळीवर असू शकतात.

yashwel@gmail.com