– डॉ. यश वेलणकर
ध्यानाचे शरीरावर कोणते परिणाम होतात, याचे संशोधन करण्याची सुरुवात डॉ. हर्बर्ट बेन्सन यांनी केली. ते हार्वर्ड विद्यापीठात शारीरक्रिया विभागात संशोधक म्हणून काम करत होते. मानसिक ताण आणि रक्तदाब यांचा परस्परसंबंध त्यांनी शोधला. तिथल्या प्रयोगशाळेत त्यांनी माकडावर संशोधन केले आणि भीतीमुळे माकडांचा रक्तदाब वाढतो हे सिद्ध केले. १९६९च्या ‘अमेरिकन जर्नल ऑफ फिजिओलॉजी’ या प्रतिष्ठित शोधपत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध झाले. त्यानंतर डॉ. बेन्सन यांनी, ध्यान करीत असताना माणसांच्या शारीरक्रिया तपासायला सुरुवात केली. ध्यान दोन ते तीन वर्षे करणारे १७ ते ४१ वयाचे साधक प्रयोगशाळेत येऊ लागले. त्यांना खुर्चीत बसवून त्यांच्या शरीरावर काही संवेदक (सेन्सर) लावले जायचे. काही साधने शरीरात खुपसून ठेवली जायची. अर्धा तास या वातावरणाशी जुळवून घेण्यास दिल्यानंतर त्यांना ध्यान सुरू करायला सांगितले जायचे. त्या वेळी त्यांच्या तपासण्या चालू राहायच्या. ध्यान झाल्यानंतर ते थांबवायला सांगून नंतरचा अर्धा तास तपासणी चालू राहायची.
या तपासणीमध्ये, ध्यान चालू केल्यानंतर शरीरात तीन वैशिष्टय़पूर्ण बदल होतात असे आढळले : (१) ध्यान सुरू केल्यानंतर शरीराकडून ऑक्सिजन वापर १० ते २० टक्के कमी होतो. झोपेमध्ये तो सहा ते सात टक्के कमी होतो. ऑक्सिजनचा वापर कमी होतो, याचाच अर्थ शरीराची चयापचय क्रिया मंद होते. झोपेमध्ये ऑक्सिजनचा वापर चार ते पाच तासांनंतर कमी झालेला आढळतो. ध्यानावस्थेत मात्र हा फरक पहिल्या तीन मिनिटांतच दिसू लागतो. (२) ध्यानाचा सराव करीत असताना श्वास गती आणि हृदयाचे ठोके मंद होतात. (३) ध्यानावस्थेत असताना रक्तातील ‘लॅक्टेट’ नावाचे रसायन कमी होते. १९६७ साली झालेल्या संशोधनात असे लक्षात आले होते की, रक्तातील ‘लॅक्टेट’चे प्रमाण जास्त असणारी माणसे चिंतेला जास्त बळी पडतात.
ध्यान सुरू केल्यानंतर दहा मिनिटांत रक्तातील ‘लॅक्टेट’चे प्रमाण कमी होऊ लागते, याचाच अर्थ शरीर-मन शांतता स्थितीत जाते. ही युद्धस्थितीच्या विरोधी स्थिती आहे. डॉ. बेन्सन यांनी या स्थितीला ‘रीलॅक्सेशन रिस्पॉन्स’ असे नाव दिले. १९७५ मध्ये याच नावाचे या संशोधनाची माहिती सांगणारे त्यांचे पुस्तक जगभर लोकप्रिय झाले.
yashwel@gmail.com