गणितातली एक वैशिष्ट्यपूर्ण संख्या म्हणजे वर्तुळाचा परीघ आणि व्यास यांचे गुणोत्तर दर्शविणारी संख्या- पाय! या संख्येसाठी रु या ग्रीक अक्षराचा उपयोग सर्वप्रथम विलियम जोन्स यांनी इ.स. १७०६ मध्ये केला. परंतु नंतर लिओनार्ड ऑयलर यांनी इ.स. १७३७ पासून या चिन्हाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर सुरू केला. नंतर हे चिन्ह सर्वमान्य झाले.

रु ही अपरिमेय (इररॅशनल) संख्या असल्याचे अठराव्या शतकात फ्रेंच गणिती एच. लॅम्बर्ट यांनी सिद्ध केले. जर्मन गणिती सी.एल.एफ. लिंडेमन यांनी पाय ही संख्या केवळ अपरिमेयच नव्हे, तर बीजातीत (ट्रान्सेन्डेंटल) असल्याचे एकोणिसाव्या शतकात सिद्ध केले. तिची अचूक किंमत काढणे शक्य नाही म्हणून अंदाजी किंमत २२/७ किंवा ३.१४ अशी सामान्यपणे घेतली जाते. परंतु पायची अचूकतेच्या अधिकाधिक जवळ जाणारी किंमत काढण्याचे आव्हान कित्येकांनी स्वीकारले. सध्याच्या प्रगत संगणकांच्या मदतीने ही किंमत लक्षावधी दशांश स्थानांपर्यंत काढण्यात यश आले आहे.

पायच्या गणित, भौतिकशास्त्र, संख्याशास्त्र, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांत असलेल्या उपयुक्ततेमुळे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जवळजवळ प्रत्येक शाखेत काम करणारे सर्व जण पायकडे आकर्षित होतात. अमेरिकी भौतिकशास्त्रज्ञ लॅरी शॉ यांना तर पाय या संख्येच्या सन्मानार्थ एक खास दिवस ‘पाय दिवस’ म्हणून साजरा करावा असे वाटले आणि १९८८ साली त्यांनी सॅन फ्रान्सिस्को येथे सर्वप्रथम १४ मार्चला पाय दिवस साजरा केला.

१४ मार्च हाच दिवस का? तर अमेरिकी दिनांक लेखनपद्धतीप्रमाणे (महिना/ दिवस/ वर्ष) ३.१४ ही संख्या १४ मार्च हा दिवस दाखविते. शिवाय हा सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा जन्मदिनही आहे. हा दिवस पायच्या ऐतिहासिक महत्त्वाबद्दल परिसंवाद, चर्चासत्रे, व्याख्याने, प्रदर्शने अशा विविध कार्यक्रमांद्वारे साजरा होतो. पायची किंमत जास्तीत जास्त दशांश स्थानांपर्यंत बिनचूक सांगण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. अमेरिकेच्या टपाल खात्याने पायबाबत या दिवशी अनेकदा नवनवी टपाल तिकिटे प्रसिद्ध केली आहेत. जगातील इतर देशांमध्येही हल्ली हा दिवस साजरा होतो.

२२ जुलै या दिवसालासुद्धा ‘पाय निकटन दिन’ (पाय अ‍ॅप्रॉक्झिमेशन डे) असे संबोधले जाते; कारण पायची २२/७ ही किंमत! भारतात काही शाळा व महाविद्याालये या दिवशी पाय दिवस साजरा करतात; कारण आपल्या दिनांक लेखनपद्धतीप्रमाणे ३.१४ हा दिवस येत नाही. दिवस कोणताही असो, पण एखाद्याा गणिती संकल्पनेच्या सन्मानार्थ विशेष दिवस साजरा करण्याची ही आगळी प्रथा नक्कीच अनुकरणीय आहे, गणित लोकप्रिय करण्यास पोषक आहे.

– डॉ. मेधा लिमये

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org

Story img Loader