डॉ. यश वेलणकर

प्रसूतीनंतर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे त्यानंतरच्या पाच आठवडय़ांत १० ते १५ टक्के स्त्रियांना औदासीन्य येते. भीतीचे झटके येणे, खूप राग येणे, रागाच्या भरात हिंसक होणे, सतत रडू येणे अशी लक्षणे या काळात दिसतात. गर्भिणी अवस्थेत औदासीन्य असेल, तर प्रसूतीनंतर ते येण्याची शक्यता वाढते. संशोधनात दिसून येत आहे की, लहान वयात प्रसूती असेल तर असे औदासीन्य अधिक प्रमाणात येते. वयाच्या पंचविशीनंतर जबाबदारीस सामोरे जाण्याची नैसर्गिक क्षमता वाढत असल्याने असे होत असावे.

इराणमध्ये केलेल्या संशोधनात अधिक शिकलेल्या स्त्रियांत हे प्रमाण तुलनेने कमी आढळले. इराणमधील तेहरान शहरातील शाहीद चामरण रुग्णालयात २०१४ साली केलेले संशोधन प्रसिद्ध आहे. तेथील ४१० प्रसूत स्त्रियांपैकी ६७ स्त्रियांत औदासीन्य आढळले. त्यांचे दोन गटांत विभाजन करून त्यातील एका गटातील स्त्रियांचे दोन महिने साक्षीध्यान शिबीर घेतले. लक्ष वर्तमान क्षणात पुन:पुन्हा आणणे, श्वासाकडे लक्ष देणे, शरीराकडे लक्ष देऊन जे जाणवते त्याचा स्वीकार करणे, बाळ स्तनपान करीत असताना तेथील संवेदना ध्यान देऊन पाहणे, मनात येणारे विचार साक्षीभाव ठेवून जाणणे, मन अस्वस्थ असेल त्या वेळी शरीरातील संवेदनांकडे लक्ष देणे, सजगतेने चालणे-खाणे-स्नान करणे.. ही तंत्रे स्त्रियांना शिकवली. दुसऱ्या गटाला हे प्रशिक्षण दिले नाही.

दोन महिन्यांनी दोन्ही गटांची तुलना केली असता ध्यान प्रशिक्षण दिलेल्या गटातील स्त्रियांची औदासीन्याची लक्षणे संख्याशास्त्रीय निकषांनुसार खूप कमी झालेली होती. त्यांचे रागाने किंवा दु:खाने बेभान होणे लक्षणीय प्रमाणात कमी होते. या काळात औदासीन्य कमी करणारी औषधे बालकावर दुष्परिणाम करीत असल्याने, ती वेळ येऊ नये म्हणून सर्व गर्भिणी स्त्रियांना ध्यानाचा सराव करण्यास प्रवृत्त करावे असा कल तिथे दिसू लागला आहे. असा सराव केल्याने नैसर्गिक प्रसूतीची शक्यता वाढते; प्रसूतीसमयी तिच्या स्नायूंवरील ताण आणि त्यामुळे नैसर्गिक प्रसूतीमधील अडथळा कमी होतो असेही दिसत आहे. गर्भधारणा झाली की जी काळजी घेतली जाते, धनुर्वाताची इंजेक्शन दिली जातात, त्या जोडीने रोज काही वेळ स्वत:च्या शरीर-मनाकडे साक्षीभाव ठेवून पाहणे हेही शिकवायला हवे. ते तिच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठीही हितकर आहे.

yashwel@gmail.com

Story img Loader