– डॉ. यश वेलणकर
मनात येणारे बरेचसे विचार हे ‘मल्टिमीडिया’ स्वरूपात मेंदूत साठवलेले असतात, हे १९५० च्या आसपास स्पष्ट झाले होते. वाइल्डर पेनफील्ड या न्यूरोसर्जननी या क्षेत्रात खूप मोलाची भर घातली. ते ‘एपिलेप्सी’ म्हणजे आकडी येण्याचा आजार बरा करण्यासाठी मेंदूवर शस्त्रक्रिया करणारे तज्ज्ञ होते. अशा शस्त्रक्रिया करताना रुग्ण ‘लोकल अॅनास्थेशिया’खाली असेल तर शुद्धीवर असतो. मेंदू संपूर्ण शरीरातील वेदना जाणत असला, तरी उघडय़ा मेंदूला टोचले तर वेदना होत नाहीत. अशा रुग्णात मेंदूतील ठरावीक भागाला इलेक्ट्रिक प्रोबने उत्तेजित केले, की त्या रुग्णाला विविध अनुभव येतात, हे पेनफील्ड यांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्याच्या नोंदी ठेवायला सुरुवात केली. त्यामुळे मेंदूतील कोणत्या भागामध्ये शरीरातील कोणत्या अवयवांचे नियंत्रण होते, हे स्पष्ट होऊ लागले. त्यांनी त्या वेळी तयार केलेला मेंदूचा नकाशा अजूनही ग्राह्य़ मानला जातो.
त्यांना असे लक्षात आले की, मेंदूतील ‘टेम्पोरल लोब’ला उत्तेजित केले की पूर्वस्मृतीतील अनुभव पुन्हा जागृत होतात. त्या वेळी त्या प्रसंगाची दृश्ये, आवाज आणि गंधदेखील येतात. स्मृतीत साठवलेला प्रसंग आत्ताच घडतोय असे वाटते. वेगळ्या ठिकाणी उत्तेजना दिली तर पूर्वस्मृती नसतानाही असे अनुभव- ज्याला आपण भास म्हणू शकतो- जाणवतात. ठरावीक भागाला उत्तेजना दिली की आपण शरीराबाहेर असल्याचा- म्हणजे ‘आऊट ऑफ द बॉडी’- अनुभवदेखील येऊ शकतो. मी शरीराच्या बाहेर असून शरीराकडे पाहतो आहे असे वाटते. काही जणांना ‘टेम्पोरल लोब’ला उत्तेजित केल्यानंतर ‘देजा वू’सारखेही अनुभव आले. ‘देजा वू’ म्हणजे एखादा प्रसंग अनुभवत असताना यापूर्वी आपण असाच अनुभव घेतला आहे असे वाटते. प्रत्यक्षात असा अनुभव कधीच घेतलेला नसतो. हा कोणताही आध्यात्मिक अनुभव नसून मेंदूतील ठरावीक भागाच्या उत्तेजनामुळे हे होते, असे पेनफील्ड यांनी दाखवून दिले. पेनफील्ड यांनी २५ वर्षे याच विषयाचा अभ्यास केला. माणसाला होणाऱ्या भासांचे कारण मेंदूतील ठरावीक भागांचे उत्तेजन आहे आणि त्या भागांना उत्तेजित केले की हे भास होतातच, हे त्यांचे संशोधन मेंदूविज्ञानात महत्त्वाचे मानले जाते. काही जणांना ध्यान करताना येणारे असे अनुभव मेंदूच्या ठरावीक भागांत अधिक उत्तेजना झाल्याने होत असावेत, असे शास्त्रज्ञांना वाटते.
yashwel@gmail.com