– डॉ. यश वेलणकर
जे करणे आवश्यक आहे हे बुद्धीला पटूनही ते करण्याची टाळाटाळ, ही माणसाची जुनी सवय आहे. त्यामुळे अनेक कामे पुढे ढकलली जातात आणि नंतर ती पूर्ण करताना तारांबळ उडते. व्यायाम, ध्यान करणे आवश्यक आहे हे पटले असले, तरी ‘आज नको, उद्या करू’ हा विचार प्रबळ ठरतो. ‘करायला हवे आहे, पण नंतर करू’ या विचारानुसार वागणे हेच दिरंगाईचे मूळ कारण असते. याचे मूळदेखील सुप्त मनात आहे. माणसाचा भावनिक मेंदू वेगवान आहे, पण त्याने केलेल्या सर्व प्रतिक्रिया जागृत मनाला समजत नाहीत. या भावनिक मेंदूत धोक्याचे केंद्र आहे तसेच सुखाचे केंद्रही आहे. भावनिक मेंदूला धोका वाटतो तेव्हा तो ‘हे नको’ अशी, तर सुख वाटते त्या वेळी ‘हे हवे’ अशी प्रतिक्रिया करतो. जे काम सुखद संवेदना निर्माण करत नाहीत ‘ते नको’ अशी भावनिक मेंदूची स्वाभाविक प्रतिक्रिया असते. त्याचमुळे जो विषय आवडत नाही त्याचा अभ्यास करणे टाळले जाते. ज्या कामाची कटकट वाटते, त्याचीच दिरंगाई होते. जे करताना शारीरिक कष्ट होतात ‘ते नकोत’ असे भावनिक मेंदू सांगतो. त्याऐवजी आवडत्याच विषयाचा अभ्यास करावा, व्यायाम न करता फोनवर कोणते नवीन संदेश आले आहेत ते पाहावे, जे काही सुखद असेल ते करावे, अशी भावनिक मेंदूची प्रतिक्रिया असते. त्या प्रतिक्रियेमुळे निर्माण होणारा विचार जागृत मनाला समजतो, तो प्रभावी ठरतो आणि माणूस तसे वागतो.
ही दिरंगाई टाळायची असेल, उद्याचे काम आजच करायचे असेल, तर ‘हे करू की ते करू’ हे मनातील द्वंद्व तटस्थपणे पाहायचे; पण निर्णय घेताना तात्कालिक सुखद काय आहे त्यापेक्षा दीर्घकालीन हित कशात आहे ते करायचे. ते करताना शरीरात त्रासदायक संवेदना निर्माण होतात, त्यांना ‘या नकोत’ अशी प्रतिक्रिया करायची नाही. दिरंगाईमुळे पुढे ढकलले जाणारे काम वेळेत करू लागलो की पाच मिनिटांनी स्वत:ला शाबासकी घ्यायची. ‘मनाची लहर मानली नाही याबद्दल मी आनंदी आहे’ ही भावना काही मिनिटे धरून ठेवायची. असे केल्याने भावनिक मेंदूतील सुखाच्या केंद्राला उत्तेजना मिळते. धोक्याच्या केंद्राच्या सक्रियतेने निर्माण होणाऱ्या त्रासदायक संवेदना स्वीकारायच्या, म्हणजे साक्षीध्यान आणि सुखद संवेदना निर्माण करायच्या. याचाच अर्थ करुणा ध्यानाने दिरंगाईची सवय बदलवता येते.
yashwel@gmail.com