डॉ. यश वेलणकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माणूस स्वत:ची वास्तव स्थिती, मनातील विचार साक्षीभावाने पाहू शकतो. पण अस्वस्थता जास्त असेल, तर ते शक्य होत नाही. अशा वेळी समुपदेशक मदत करू शकतो. मानसोपचारात असे समुपदेशन कार्ल रॉजर्स यांनी १९४२ मध्ये सुरू केले. त्यापूर्वी मनोविश्लेषण आणि वर्तनचिकित्सा या दोन पद्धतींनी मानसोपचार केले जात होते. मात्र या दोन्ही पद्धतींत डॉक्टर वा थेरपिस्ट महत्त्वाचा असे. तो रुग्णाच्या आजाराचे निदान करून आवश्यक ती उपाययोजना करीत असे. रॉजर्स यांनी ‘पेशंट’ हा शब्द बदलून ‘क्लायंट’ हा शब्द वापरायला सुरुवात केली. त्यांनी ‘सायकोथेरपी अ‍ॅण्ड काऊन्सिलिंग’ हे पुस्तक लिहून मानसोपचाराची तिसरी पद्धत रूढ केली. तिला ‘मानवकेंद्रित मानसोपचार’ असे म्हटले जाते. या पद्धतीत थेरपिस्ट आणि क्लायंट एकाच पातळीवर असतात. डॉक्टर स्वत:ला उच्च समजतो आणि रुग्णाला प्रिस्क्रिप्शन लिहून देतो, तसे येथे अपेक्षित नसते. समुपदेशक ग्राहकाशी भावनिक नाते जोडतो, त्यास स्व-स्थितीकडे तटस्थपणे पाहायला प्रवृत्त करतो. प्रत्येक माणसात निर्णयक्षमता असते, मात्र काही वेळा ती दडपली गेलेली असते. समुपदेशक ग्राहकामधील ती क्षमता चेतवतो. होत असलेला त्रास कमी करण्याचे, परिस्थिती बदलण्याचे कोणकोणते पर्याय आहेत; प्रत्येक पर्यायाचे फायदे-तोटे कोणते आहेत, याची तो चर्चा करतो. तो कोणताही उपदेश करीत नाही, सल्ला किंवा औषधेही देत नाही. भावनिक गत्रेत अडकलेल्याला आधार देऊन त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची प्रेरणा देतो. माणसातील अंगभूत सामर्थ्यांला हात घालून क्लायंटचा आत्मविश्वास वाढवतो. म्हणूनच या पद्धतीला ‘क्लायंट सेंटर्ड थेरपी’ म्हटले जाऊ लागले. रॉजर्स यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित याच नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यांच्या या पद्धतीचा प्रभाव आजही आहे. समुपदेशन असेच असावे, त्यात कोणताही उपदेश नसावा, हे रूढ झाले आहे.

माणसामध्ये अन्य प्राण्यांपेक्षा काही वेगळे गुण असतात. तो त्याच्या भविष्याची कल्पना करू शकतो; एखादी नवीन कल्पना त्याला सुचू शकते. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी तो जिद्दीने प्रयत्न करू शकतो. स्वत:चे आयुष्य कोणत्या दिशेने जायला हवे, याचा निर्णय घेण्याची क्षमता माणसात असते. समुपदेशक योग्य प्रश्न विचारून ग्राहकाला याचा विचार करायला प्रवृत्त करतो. त्यामुळे असे अनेक समुपदेशक तयार होण्याची सध्या गरज आहे.

yashwel@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on psychiatric counseling abn