डॉ. यश वेलणकर

चिंता वाटत राहणे हे मानसिक तणावाचे एक लक्षण आहे, पण मानसिक तणाव नेहमी वाईटच असतो असे नाही. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी मानसिक तणाव असला तर माणूस मेहनत घेतो. माझा अभ्यास झालेला नाही; आता परीक्षेत काय होईल, अशी चिंता परीक्षेपूर्वी पंधरा दिवस आधी वाटली तर पुढील काळात अभ्यास चांगला होऊ शकतो. पण हाच विचार परीक्षा हॉलमध्ये आला तर त्रासदायक ठरतो. मानसिक तणाव दडपण, संघर्ष आणि नैराश्य असा तीन प्रकारचा असतो. दडपण वेळेचे तसेच गुणवत्तेचे असते. वेळेचे दडपण असायलाच हवे, तरच दिलेली वेळ पाळली जाते. मात्र ठरावीक वेळेत एखादे काम पूर्ण करण्याचा- म्हणजे ‘डेडलाइन’चा तणाव अनेकांना त्रासदायक वाटतो. याउलट काहींना ‘डेडलाइन’ असेल तरच लक्ष विचलित न होता काम होते.

म्हणजेच तणाव ही अतिशय सापेक्ष गोष्ट आहे. प्रत्येक माणसाची तणावाची कारणे वेगवेगळी असतात. त्यासाठी स्वत:वर कोणत्या प्रकारचा तणाव अधिक येतो, याचा अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. मैफील सुरू करण्यापूर्वी तबलजी तबल्याच्या चर्मावरील ताण हातोडय़ाने ठोकून समतोल करतात, तसेच मानसिक तणावही योग्य पातळीत ठेवणे आवश्यक असते. गुणवत्तेचे दडपण योग्य प्रमाणात उपयोगी असते. ते दडपण कोणत्याही परीक्षेतील गुणवत्तेचे असते किंवा माझे भाषण, कार्यक्रम, खेळ चांगला होईल की नाही, या विचारांनी असते. योग्य वेळी आलेले हे दडपण गुणवत्ता वाढवायला प्रेरक ठरते.

पण असेच दडपण काहीवेळा त्रासदायक होते. नवविवाहित तरुणाला असा  तणाव अधिक असेल, तर तो शृंगारही टाळू लागतो. काहींना कार्यालयातील बॉसचा किंवा महाविद्यालयातील ठरावीक प्राध्यापकांचा दबाव वाटतो. ते समोर असतील तर काम नीट होत नाही. काही जणांना कामाचेच प्रेशर येते. एवढे मोठे काम कसे काय पूर्ण होईल, या विचारानेच त्यांचे त्राण निघून जाते. दडपणाचा तणाव कल्पनादर्शन ध्यानाच्या सरावाने कमी होतो. ज्या कृतीचे दडपण येते,  ती आपण सहजतेने आणि उत्तमरीत्या करीत आहोत असे दृश्य पुन:पुन्हा पाहिल्याने ‘मेंटल रिहर्सल’ होते. अशी कल्पना करतानाही छातीत धडधड वाढत असेल, तर दीर्घश्वसन करायचे आणि पुन्हा कल्पनादृश्य पाहायचे. असा सराव नियमितपणे केल्याने गुणवत्तेच्या दडपणाचा त्रास कमी होतो.

yashwel@gmail.com