– डॉ. यश वेलणकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रबळ झालेले रज आणि तम गुण कमी करून सत्त्व गुण विकसित करणे, हे आयुर्वेद सत्त्वावजय चिकित्सेचे महत्त्वाचे ध्येय असते. पती-पत्नीतील समागमदेखील एकमेकांना सुख देण्यासाठी असतो, त्या वेळी सात्त्विक असतो. रज गुण वाढलेला असतो, तेव्हा केवळ स्वत:च्या सुखाचा विचार असतो. तो खूप अधिक असेल तर समागम क्रियेतदेखील लक्ष लागत नाही, आनंद मिळत नाही. याउलट तम गुण प्रबळ असेल तर मनात उदासी, कंटाळा असतो, सारा जुलमाचा रामराम असतो. लक्ष जाणे आणि लक्ष देणे या दोन वेगवेगळ्या क्रिया आहेत. लक्ष जाते त्यावर माणसाचे नियंत्रण असत नाही, ते भविष्याच्या किंवा उदासीच्या विचारात जात राहते. सत्त्व गुण विकसित करायचा म्हणजे लक्ष देण्याची क्रिया जाणीवपूर्वक करायची. वर्तमान क्षणात जे काही घडते आहे त्यावर माणूस लक्ष देतो तेव्हा सत्त्व गुण हा रज आणि तम यांवर विजय मिळवतो.

कुठे लक्ष द्यायचे आहे हे ठरवून तेथे प्रयत्नपूर्वक लक्ष देणे हे कौशल्य आहे. पोहणे, गाडी चालवणे ही कौशल्ये ज्याप्रमाणे केवळ माहिती घेऊन विकसित करता येत नाहीत, त्यांचा प्रत्यक्ष सराव करावा लागतो; त्याचप्रमाणे लक्ष देण्याचे कौशल्य प्रत्यक्ष सराव केल्यानेच विकसित होते. असे लक्ष वर्तमान कृती, त्या वेळी ज्ञानेंद्रियांना मिळणारे अनुभव, शरीरातील संवेदना यांवर देता येते. भूत आणि भविष्यकाळात भरकटणारे मन आनंदी नसते, ते वर्तमान क्षणात असले तरच आनंद मिळतो. संभोग, सम्यक भोग क्रियेत शरीरातील सुखदायी संवेदना अत्युच्च असल्याने त्या वेळी मन वर्तमान क्षणात राहते, त्यामुळेच या कृतीचे आकर्षण असते. मात्र रज किंवा तम गुण वाढला असेल तर ती क्रियाही सुखदायी राहत नाही. अनेक वैवाहिक जोडप्यांमध्ये ही समस्या असते. नवविवाहित जोडप्यांत अशा समस्या असतात, तशाच मुले झाल्यानंतर वयाच्या चाळिशीतदेखील त्या निर्माण होऊ शकतात. त्यावर कोणते योग्य उपाय आहेत हे माहीत नसल्याने एकमेकांना दोष देत भांडणे विकोपाला जातात.

अशा वेळी समुपदेशनाने नक्की कोणती समस्या आहे, त्यामध्ये काही शारीरिक कारणे आहेत का, याचा शोध घेता येतो आणि उपाय योजता येतात. शैथिल्य, शीघ्रपतन, रुक्षता वाढणे, भीती, उदासी, कंटाळा, जोडीदाराचे त्या वेळी विकृत वागणे अशा अनेक तक्रारींमधील मानसिक कारणे सत्त्वावजय चिकित्सेने बरी होतात.

yashwel@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on samyak bhog abn