अरबी द्वीपकल्प किंवा, अरेबिया हे पश्चिम आशिया आणि आफ्रिका खंडांच्या सीमेवरील एक द्वीपकल्प आहे. भौगोलिकदृष्ट्या या द्वीपकल्पात कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या देशांचा समावेश होतो. क्षेत्रफळाने या सर्वांत मोठा असा देश सौदी अरेबिया हा आहे. अरबी भाषेत अल्-माम्लका अल्-अरेबिया अस्सूदीय्या असे लांबलचक नाव असलेला सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे असून ते या देशातले सर्वांत मोठे शहर. मक्का आणि मदिना ही इस्लाम धर्मातील दोन सर्वाधिक पवित्र स्थळे येथे असल्यामुळे इस्लामी समाजात सौदी अरेबियाचे महत्त्व आहे. इस्लामचे प्रवर्तक मुहम्मद पैगंबर यांचा जन्म याच प्रदेशात झाला. पूर्वेला पर्शियन आखात आणि पश्चिमेला लाल समुद्र असलेल्या सौदी अरेबियाच्या दक्षिणेला येमेन, इशान्य आणि पूर्वेस संयुक्त अरब अमिरात, ओमान, कतार आणि बहरिन तर उत्तरेस जॉर्डन आणि इराक अशा याच्या चतु:सीमा आहेत. सौदी अरेबियाच्या वायव्येस गल्फ ऑफ अकाबाच्या पलीकडे इजिप्त आणि इस्राायल हे देश आहेत. साडेएकवीस लाख चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेला सौदी अरेबिया हा जगातला तेरावा सर्वाधिक मोठा देश आहे. सौदी अरेबिया या देशाने अरेबिया या द्वीपकल्पाची ८० टक्के जमीन व्यापली आहे. साडेतीन कोटी लोकसंख्येच्या या देशात ९४ टक्के लोक इस्लाम धर्मीय, ४ टक्के ख्रिश्चन तर दोन टक्क्यांमध्ये हिंदू, बौद्ध वगैरे धर्मांवर श्रद्धा असलेले आहेत. तसेच या लोकवस्तीपैकी ९० टक्के अरबी वंशाचे आणि उर्वरित १० टक्के लोक अफ्रो अरब वंशाचे आहेत. येथील इस्लाम धर्मीयांमध्ये बहुतेक सर्व सुन्नी पंथाचे आहेत. अत्यंत कमी पाऊस असलेला आणि बहुतांश प्रदेश वाळवंटीय असलेल्या सौदी अरेबियाचा केवळ एक टक्का जमीन कृषीयोग्य आहे!

असे असले तरी जगातील सर्वाधिक खनिज तेलाचे साठे सौदी अरेबियामध्ये आहेत. जगाला एकूण लागणाऱ्या खनिज तेलापैकी हा देश २० टक्के पुरवठा करतो आणि येथील ७८ टक्के अर्थव्यवस्था खनिज तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. सौदी अरेबियाची शासकीय राजकीय व्यवस्था पूर्णपणे राजेशाही स्वरूपाची असून तेथे शरिया कायदा चालतो. सलमान बिन अब्दुल अझीझ अल सौद हे तिथले विद्यमान राजे होत.

– सुनीत पोतनीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sunitpotnis94@gmail.com