– डॉ. यश वेलणकर
स्वत:च्या त्रासदायक भावनांची तीव्रता, वारंवारता आणि कालावधी कमी करता येणे हे कौशल्य आहे. त्यासाठी ‘भावनांची मोजपट्टी’ हे सोपे तंत्र आहे. त्यानुसार ‘आत्ता मला कसे वाटते आहे,’ असा प्रश्न स्वत:ला विचारायचा. या मोजपट्टीवर शून्य म्हणजे समतोल स्थिती होय. छान वाटत असेल तर किती छान वाटते आहे, त्याला क्रमांक द्यायचा. अधिक पाच म्हणजे खूपच छान.. फ्लो अवस्था. त्या वेळी या मोजपट्टीचेही भान नसते. मोजपट्टीचे भान आहे म्हणजे त्यापेक्षा थोडा कमी आनंद आहे. तो एक ते चार या अंकांत ठरवायचा. घाण वाटत असेल, अस्वस्थता असेल, तर वजा बाजूला असेच क्रमांक द्यायचे. वजा पाच म्हणजे तीव्र विघातक भावनांमुळे असलेली बेभान अवस्था होय. त्या वेळीही या मोजपट्टीचे भान असणार नाही. ते भान आहे, पण खूपच वाईट वाटत असल्यास वजा चार हा अंक स्वत:च्या भावनिक स्थितीला द्यायचा. त्यापेक्षा कमी अस्वस्थता असेल तर वजा तीन, वजा दोन किंवा वजा एक अशी नोंद करायची. ही नोंद व्यक्तीसापेक्ष असेल; पण अशी मोजपट्टी आपण मनातल्या मनात तयार करतो आणि स्वत:च्या भावनिक स्थितीला एखादा क्रमांक देतो, त्यामुळे त्या भावनांच्या प्रवाहातून माणूस स्वत:ला वेगळे करतो.
काहीही मोजायचे असेल तर त्यापासून अलग व्हावे लागते. भावनिक स्थितीला असा क्रमांक देताना माणसाचा वैचारिक मेंदू काम करू लागतो, त्यामुळे भावनिक बुद्धी विकसित होते. सकाळी जाग आल्यापासून रात्री झोपेपर्यंत चार-पाच वेळा या मोजपट्टीचा उपयोग करायचा. त्यासाठी वेळ लागत नाही, सजगता लागते. या मोजपट्टीवर आपण सतत अधिक बाजूलाच असू, तर आपली भावनांची सजगता कमी आहे. कारण काही वेळ उदासी येणे नैसर्गिक आहे. वजा दोन ते अधिक पाच यामध्ये असणे भावनिक आरोग्याचे आणि सतत वजाच्याच बाजूला असणे हे अनारोग्याचे लक्षण आहे.
या मोजपट्टीवर वजाच्या बाजूला असताना शरीरावर लक्ष नेऊन संवेदना जाणणे आणि त्यांचा स्वीकार करण्यामुळे माणूस त्या वेळी शून्याच्या दिशेने येऊ लागतो. म्हणजेच अस्वस्थ करणाऱ्या भावनांचा कालावधी कमी होतो. हा साक्षीभावाचा सराव अधिकाधिक वेळ केला तर वजा पाचला जाण्याची प्रवृत्ती, विघातक भावनांची तीव्रता कमी होते. वारंवार अस्वस्थ होण्याची सवयही बदलते. भावनांची मोजपट्टी वापरायला शिकवणे हा मानसिक प्रथमोपचारांतील महत्त्वाचा भाग आहे.
yashwel@gmail.com